मेलबर्न, २७ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : भारताचा अनुभवी टेनिसपटू रोहन बोपण्णा याने ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये ऐतिहासिक कामगिरी केली आहे. बोपण्णाने त्याचा ऑस्ट्रेलियन जोडीदार मॅथ्यू एबडेनसह पुरुष दुहेरीचे विजेतेपद पटकावले.
ग्रँड स्लॅम जिंकणारा सर्वात वयस्कर पुरुष खेळाडू
मेलबर्न पार्क येथे शनिवारी खेळल्या गेलेल्या पुरुष दुहेरीच्या अंतिम सामन्यात रोहन बोपण्णा – मॅथ्यू एबडेन या जोडीने इटलीच्या सिमोन बोलेली आणि आंद्रे वावासोरी या जोडीचा ७ – ६, ७ – ५ असा पराभव केला. या विजयासह ४३ वर्षीय रोहन बोपण्णा ग्रँड स्लॅम जिंकणारा सर्वात वयस्कर पुरुष खेळाडू झाला आहे. यापूर्वीचा विक्रम नेदरलँड्सच्या जीन-ज्युलियन रॉजरच्या नावावर होता. त्याने ४० वर्ष आणि ९ महिने वयात २०२२ मध्ये फ्रेंच ओपन पुरुष दुहेरीचे विजेतेपद पटकावले होते.
अटीतटीच्या सामन्यात विजय
अंतिम सामना १ तास ३९ मिनिटे चालला. पहिला सेट टायब्रेकरवर गेला. टायब्रेकरमध्ये बोपण्णा – एबडेन जोडीने एकही गेम गमावला नाही आणि सेट जिंकला. दुसरा सेट देखील अटीतटीचा झाला. या सेटच्या अकराव्या गेममध्ये बोपण्णा – एबडेन जोडीने इटालियन खेळाडूंची सर्व्हिस ब्रेक केली आणि विजयश्री खेचून आणली.
पुरुष दुहेरीचे पहिलेच ग्रँडस्लॅम
रोहन बोपण्णाचे पुरुष दुहेरीचे पहिलेच ग्रँडस्लॅम विजेतेपद आहे. याआधी त्याने मिश्र दुहेरीत फ्रेंच ओपन २०१७ चे विजेतेपद पटकावले. तो २०१० आणि २०२३ मध्ये यूएस ओपन तर २०२२ मध्ये फ्रेंच ओपनचा उपविजेता झाला. त्याने २०१३, २०१५ आणि २०२३ मध्ये विम्बल्डन टेनिस स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली होती.