Koradi Hanuman Statue: उपराजधानी नागपूरातील कोराडी परिसरात अध्यात्म आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा एक अद्भूत संगम पाहायला मिळणार आहे. कोराडीच्या श्री महालक्ष्मी जगदंबा मंदिरालगत मध्य भारतातील सर्वात उंच आणि भव्य हनुमान मूर्तीचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. या महाकाय प्रकल्पाचे लोकार्पण केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांच्या हस्ते होणार असून, या सोहळ्याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
206 फुटांचे भव्य स्ट्रक्चर
या प्रकल्पाची एकूण उंची पायापासून (फाउंडेशन) तब्बल 206 फूट आहे, तर हनुमंतांच्या मूर्तीची प्रत्यक्ष उंची 162 फूट इतकी अवाढव्य आहे. या मूर्तीचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे हनुमानांच्या हातातील 74 फूट उंच गदा. ही जगातील सर्वात मोठ्या गदांपैकी एक असून, तिची नोंद ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि धार्मिक अनुभव
प्रख्यात मूर्तिकार नरेश कुमावत यांनी ही मूर्ती साकारली असून, यासाठी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. मूर्तीला विशेष धातूचा लेप (Metal Coating) लावण्यात आला आहे, ज्यामुळे ती अधिक चकाकदार आणि दीर्घकाळ टिकणारी असेल. रात्रीच्या वेळी या मूर्तीवर लेझर लाईटिंग आणि प्रोजेक्शन मॅपिंगच्या माध्यमातून 'हनुमान चालीसा' तसेच प्रभू रामचंद्रांच्या जीवनातील प्रसंग जिवंत केले जातील. तसेच मूर्तीच्या पायथ्याशी एक कृत्रिम तलाव आणि रामायणातील विविध प्रसंगांची नयनरम्य मांडणी केली जाणार आहे.
धार्मिक पर्यटनाचा नवा नकाशा
नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकल्पाचे काम जून महिन्यापर्यंत पूर्ण होईल. या भव्य मूर्तीमुळे कोराडी परिसराचा चेहरामोहरा बदलणार असून, हे ठिकाण देशातील धार्मिक पर्यटनाचे एक प्रमुख केंद्र म्हणून ओळखले जाईल. ही मूर्ती केवळ भव्यतेचे प्रतीक नसून, त्याद्वारे भक्ती, शक्ती आणि सेवाभावाचा संदेश आधुनिक पद्धतीने नव्या पिढीपर्यंत पोहोचवला जाणार आहे.