Manoj Jarange: मराठा समाज बांधवांना कुणबी प्रमाणपत्रे देणे आणि जात पडताळणी प्रक्रियेतील त्रुटी दूर करणे या प्रमुख मागण्यांसाठी आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा जालन्यातील अंतरवली सराटी येथे बेमुदत आमरण उपोषणास प्रारंभ केला आहे. वंशावळ शोध समितीला सरकारने दिलेली मुदतवाढ अमान्य करत त्यांनी राज्य शासनाविरोधात पूर्ण ताकदीने लढा पुकारला आहे. उपोषणाच्या पहिल्याच दिवशी राज्यभरातून लाखो मराठा समर्थक अंतरवलीत दाखल झाले. यावेळी जमावाला संबोधित करताना जरांगे यांनी, “हे आपल्या हक्कांचे आणि अस्तित्वाचे शेवटचे आंदोलन असून यातून एक पाऊलही मागे हटणार नाही,” असा एल्गार पुकारला. तसेच 12 तारखेला मुंबई कूचची अंतिम तारीख जाहीर करून संपूर्ण राज्याची राजधानी ठप्प करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. आता मागण्या मान्य झाल्या नाही तर माघार घेणार नाही. तसेच हे शेवटचं आंदोलन असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.
40 लाखांहून अधिक दुचाकींसह 5 टप्प्यांत होणार मुंबईत प्रवेश
मुंबईतील नियोजित आंदोलनाची रूपरेषा मांडताना जरांगे पाटील म्हणाले की, ही लढाई अत्यंत नियोजनबद्ध आणि शांततापूर्ण मार्गाने लढली जाईल. “मुंबईत 5 वेगवेगळ्या टप्प्यांत मराठा समाज प्रवेश करेल आणि सुमारे 40 ते 45 लाख मोटारसायकलचा ताफा घेऊन आम्ही राजधानीत धडकू,” असा दावा त्यांनी केला. केवळ तरुणांनीच नव्हे तर 50 ते 60 वयोगटातील ज्येष्ठांनीही या लढ्यात आघाडीवर राहावे, असे आवाहन त्यांनी केले. मुंबईतील स्थानिक मराठा बांधवांनी केवळ आंदोलकांच्या जेवणाची सोय पाहावी, बाकी लढाई आम्ही मैदानात लढू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 3 दिवसांत परतावे लागेल असे अर्धवट आंदोलन न करता, पूर्ण तयारी करूनच ठिय्या मांडण्याचा त्यांचा इरादा आहे.
सत्तेचा अहंकार मराठ्यांच्या एकजुटीपुढे टिकणार नाही
राज्य सरकारच्या कारभारावर आणि भूमिकेवर तीव्र शब्दप्रहार करताना जरांगे यांनी सत्ताधाऱ्यांना थेट आव्हान दिले. “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मी काय गोष्ट आहे याची पूर्ण जाणीव आहे. आम्ही एकदा नियोजनबद्ध रीतीने मैदानात उतरलो तर मुंबईच काय, दिल्लीचे सिंहासनही हादरवून टाकू,” अशा आक्रमक शब्दांत त्यांनी सरकारवर निशाणा साधला. राज्यातील शेतकरी, कष्टकरी, कामगार आणि इतर सर्वच घटक सध्याच्या प्रशासनाला कंटाळले असून मराठा समाजाची ही लाट सत्तेचा अहंकार मोडून काढेल, असा इशारा देत त्यांनी आगामी मुंबई आंदोलनासाठी कार्यकर्त्यांना सज्ज राहण्याचे निर्देश दिले.