Uddhav Thackeray: राज्यातील शेतकरी नैसर्गिक संकटांचा सामना करत असताना, पीक नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी 5 ऑक्टोबरची तारीख निश्चित करणाऱ्या महायुती सरकारवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी तीव्र शब्दांत निशाणा साधला आहे. छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेवर थेट ताशेरे ओढले. नुकसानीने शेतकरी खचलेला असताना पंचनाम्यांसाठी 5 ऑक्टोबरचा कोणता मुहूर्त शोधून काढला आहे, असा संतप्त सवाल त्यांनी केला. एनडीआरएफच्या नियमांचे कारण पुढे करून सरकार आपली जबाबदारी ढकलत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला.
‘अल निनो’चे संकट माहीत असूनही उपाययोजना शून्य
नैसर्गिक आपत्ती ही मानवाच्या हातात नसली, तरी प्रशासकीय नियोजन आणि पूर्वतयारी ही पूर्णपणे सरकारच्या हातात असते. ‘अल निनो’च्या प्रभावामुळे यंदा दुष्काळी परिस्थिती निर्माण होणार हे आधीच स्पष्ट असतानाही राज्य सरकारने वेळेत कोणतीही ठोस पावले का उचलली नाहीत, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. आगामी काळात ग्रामीण भागात चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण होणार असून, त्यावर सरकारकडे कोणतेही स्पष्ट नियोजन नाही. आपण मुख्यमंत्री असताना कोरोनाच्या महाभयंकर संकटातही ‘शिवभोजन’सारख्या योजनांमधून सर्वसामान्यांना आणि शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले नव्हते, याची आठवणही त्यांनी करून दिली.
ठाकरे गटाचे आमदार-खासदार करणार विदर्भ-मराठवाड्याचा दौरा
मागील वर्षी अतिवृष्टीच्या काळात सरकारने जाहीर केलेले हजारो कोटींचे मोठे पॅकेज प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेच नाही, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी कर्जमुक्तीच्या आकडेवारीवरही प्रश्न उपस्थित केले. केवळ आकड्यांचा खेळ करून बँका आणि सरकार स्वतःचा फायदा करून घेत असल्याचा आरोप त्यांनी केला. शेतकऱ्यांचे प्राण कंठाशी आले असताना सत्ताधारी मात्र आपापसात राजकारण करण्यात व्यस्त आहेत. या पार्श्वभूमीवर, बळीराजाच्या व्यथा समजून घेण्यासाठी आणि त्यांना धीर देण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे सर्व खासदार व आमदार लवकरच विदर्भ तसेच मराठवाड्याचा दौरा करून थेट बांधावर जाऊन परिस्थितीची पाहणी करणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.