Devendra Fadnavis: नागपुरातील एका विशेष कार्यक्रमात नव्या पिढीतील तरुणांशी (Gen Z) गप्पा मारताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या राजकीय प्रवासातील काही महत्त्वपूर्ण पैलूंवर प्रकाश टाकला. राजकारण, खेळ किंवा उद्योग अशा कोणत्याही क्षेत्रात यश मिळवताना येणाऱ्या मानसिक तणावाचा सामना कसा करावा, यावर त्यांनी भाष्य केले. फडणवीस यांच्या मते, राजकारण हे त्यांच्यासाठी केवळ एक व्यवसाय किंवा आजीविकेचे साधन नसून ते सामाजिक आणि आर्थिक परिवर्त घडवून आणण्याचे एक प्रभावी माध्यम आणि ध्येय आहे. जेव्हा माणूस एखाद्या कामाला स्वतःचे ध्येय मानून चालतो, तेव्हा कामाचा ताण किंवा दबाव हा अडथळा न ठरता उद्दिष्ट गाठण्याची प्रेरणा बनतो, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
18 व्या वर्षी हाती घेतलेले राष्ट्रसेवेचे व्रत
आपल्या आयुष्यातील सुरुवातीच्या दिवसांची आठवण सांगताना त्यांनी 18 व्या वर्षी राष्ट्रीय छात्र परिषद/विद्यार्थी चळवळीच्या माध्यमातून सुरू झालेल्या संघर्षाचा किस्सा सांगितला. त्या काळात श्रीनगरमधील ऐतिहासिक लाल चौकात तिरंगा फडकवणे हे अत्यंत आव्हानात्मक आणि जोखमीचे काम मानले जायचे. या मोहिमेत सहभागी होण्यासाठी अवघ्या 16 ते 18 वर्षे वयोगटातील 30 तरुणांच्या तुकडीचे नेतृत्व करत ते जम्मू आणि उधमपूरच्या दिशेने रवाना झाले होते. उधमपूर येथे सुरक्षारक्षकांनी अडवल्यानंतरही या तरुणांनी हार न मानता पायी चालत पुढे जाण्याचा निर्धार केला होता. अखेर लष्कराकडून त्यांना ताब्यात घेण्यात आले आणि पुन्हा दिल्लीला पाठवण्यात आले.
लाल चौकातील तिरंगा आणि ऐतिहासिक क्षण
दिल्लीत पोहोचल्यानंतर या सर्व तरुणांनी थेट पंतप्रधानांच्या निवासाला वेढा घातला आणि लाल चौकात भारतीय राष्ट्रध्वज फडकवण्याची मागणी करत त्यांच्याकडे तिरंगा सोपवला. या संघर्षाची फलश्रुती पुढे काही वर्षांनी पाहायला मिळाली. १९९२ मध्ये मुरली मनोहर जोशी आणि नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या ऐतिहासिक एकता यात्रेत सहभागी होऊन श्रीनगरच्या लाल चौकात सन्मानाने तिरंगा फडकवण्यात आला. युवा पिढीने आपल्या ध्येयावर ठाम राहून सतत प्रयत्नशील राहावे, असा संदेश फडणवीस यांनी या प्रसंगाच्या माध्यमातून दिला.