Santosh Deshmukh Case: बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख मृत्यू प्रकरणातील प्रमुख संशयित आरोपी वाल्मिक कराड पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. बीड जिल्हा मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त असलेल्या कराडला राजकीय वजनापोटी नियमबाह्य सवलती आणि व्हीआयपी सुविधा पुरवल्या जात असल्याचा खळबळजनक आरोप समोर आला आहे. संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी याप्रकरणी थेट तुरुंग अधीक्षकांना पत्र लिहून तक्रार नोंदवली आहे. आरोपी कराड इतर कैद्यांचे तसेच वकिलांच्या सिमकार्डचा वापर करून बाहेर फोन करत असल्याचे, दुपारी बंदिस्त वेळेत अधीक्षक कार्यालयात बसून व्हिडिओ कॉल करत असल्याचे आणि बराक क्रमांक 9 जवळील फोनजवळ मुद्दाम सीटीव्ही कॅमेरा न ठेवल्याचे गंभीर मुद्दे या पत्रात नमूद करण्यात आले आहेत.
वाल्मिक कराडची नागपूर मध्यवर्ती कारागृहात रवानगी करा – सुप्रिया सुळे
या संपूर्ण प्रकरणाची तात्काळ दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियाद्वारे राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. 'हा प्रकार म्हणजे थेट न्यायव्यवस्थेची थट्टा आहे,' असे स्पष्ट करत त्यांनी थेट राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे काही महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत. आरोपी वाल्मिक कराडला बीड कारागृहातून तातडीने नागपूर मध्यवर्ती जेलमध्ये हलवण्यात यावे, बीड जेलमधील कॉल लॉग, भेट नोंदवही (विजिस्टर रजिस्टर) आणि सीसीटीव्ही फुटेज जप्त करून या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी केली जावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच या गैरप्रकारात आरोपीला पाठीशी घालणाऱ्या आणि नियम मोडणाऱ्या जेल कर्मचाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करण्याची मागणी करत देशमुख कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही ठाम असल्याचे त्यांनी नमूद केले.
खासदार बजरंग सोनवणे यांची गृहमंत्र्यांकडे तक्रार
दुसरीकडे, बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनीही या मुद्द्यावरून दिल्लीत हालचाली तीव्र केल्या आहेत. दोन दिवसांपूर्वीच त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची प्रत्यक्ष भेट घेऊन बीड कारागृहातील भोंगळ कारभाराबाबत निवेदन दिले होते. बीड जेलमध्ये काही ठराविक कैद्यांना मोबाईल वापरण्याची मुभा, बंदी असलेल्या वस्तू पुरवणे आणि अवाजवी सवलती देण्याचे प्रकार घडत असल्याने या संपूर्ण प्रकरणाची केंद्र किंवा उच्चस्तरीय यंत्रणेमार्फत चौकशी करण्याची मागणी सोनवणे यांनी केली आहे.