Vinod Tawde UP Vidhansabha Election 2027 BJP Strategy: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत सत्तेची हॅटट्रिक साधण्याच्या हेतूने भारतीय जनता पक्षाने (BJP) आतापासूनच जोरदार तयारी सुरू केली आहे. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि उत्तर प्रदेशचे नवनिर्वाचित प्रभारी विनोद तावडे यांनी लखनौत पोहोचून 'मिशन 2027' ची कमान हाती घेतली आहे. दोन दिवसीय लखनौ दौऱ्यादरम्यान त्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि पक्षाच्या प्रमुख संघटनात्मक पदाधिकाऱ्यांशी प्रदीर्घ चर्चा करून आगामी रणनीतीची आखणी केली. तावडे हे पुढील 3 महिने उत्तर प्रदेशातच तळ ठोकून पक्षाच्या संघटनात्मक मजबुतीवर लक्ष केंद्रित करणार आहेत.
काय आहे विनोद तावडेंचा '4C' प्लॅन?
दिखाऊपणा आणि भव्य स्वागताऐवजी प्रत्यक्ष कामावर भर देणाऱ्या विनोद तावडे यांनी पक्षासाठी 4C हा विशेष फॉर्म्युला तयार केला आहे, जो निवडणुकीत 'गेमचेंजर' ठरू शकतो:
– Coordination (समन्वय): पक्ष संघटना आणि सरकार यांच्यात उत्तम ताळमेळ राखून कल्याणकारी योजना जनतेपर्यंत पोहोचवणे.
– Cadre (कार्यकर्ता वर्ग): बूथ प्रमुख, पन्ना प्रमुख ते मंडळ अध्यक्षांपर्यंतच्या कार्यकर्त्यांना सन्मान देऊन त्यांचे प्रश्न सोडवणे.
– Caste (जातीगत समीकरणे): प्रत्येक मतदारसंघातील सामाजिक आणि जातीगत समीकरणांचा बारकाईने अभ्यास करून व्युहरचना आखणे.
– Candidacy (उमेदवारी): उमेदवाराची भागातील प्रतिमा आणि निवडून येण्याची क्षमता पडताळून तिकीट वाटप करणे.
विशेषतः 2024 च्या लोकसभा निवडणुकीत ज्या सुमारे 100 विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपची कामगिरी सुमार झाली होती, तिथे या प्लॅननुसार विशेष लक्ष दिले जाणार आहे.
विनोद तावडेंचा आजवरचा यशस्वी राजकीय प्रवास
भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने विनोद तावडे यांच्यावर विश्वास व्यक्त करण्यामागे त्यांचा आजवरचा संघटनात्मक अनुभव आणि यशस्वी मोहिमांचा कार्यकाळ आहे:
– 2022 आणि 2025 राष्ट्रपती-उपराष्ट्रपती निवडणुका: एनडीएच्या उमेदवार श्रीमती द्रौपदी मुर्मू (2022) आणि सी. पी. राधाकृष्णन (2025) यांच्या निवडणूक प्रभारीपदाची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली.
– बिहारमधील ऐतिहासिक सत्तापालट: 2022 मध्ये बिहारचे प्रभारी झाल्यावर त्यांनी राजकीय चित्रे बदलले. 2023 मध्ये एनडीएचे सरकार स्थापन करून 2024 लोकसभा आणि 2025 च्या बिहार विधानसभा निवडणुकीत पक्षाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला.
– 2026 केरळ विधानसभा निवडणूक: केरळचे निवडणूक प्रभारी म्हणून काम पाहताना पक्षाची आजवरची सर्वोत्तम कामगिरी नोंदवण्यात योगदान दिले.
– राष्ट्रीय मोहिमा व सदस्यत्व: 'संघटन पर्व 2024' अंतर्गत केवळ 15 दिवसांत देशात 5 कोटी नवे सदस्य जोडले. याशिवाय 'ऑपरेशन गंगा' द्वारे युक्रेनमधून भारतीय विद्यार्थ्यांना सुरक्षित आणण्यात मोलाची भूमिका बजावली.
सामूहिक नेतृत्व आणि 'सांघिक खेळा'वर भर
विनोद तावडे यांनी लखनौत पोहोचताच 'व्यक्तिपूजा' ऐवजी सामूहिक नेतृत्वावर भर देण्याचा संदेश दिला आहे. कोणत्याही एका व्यक्तीला पुढे आणण्याऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि पक्षाचे राष्ट्रीय नेतृत्व यांच्या संयुक्त प्रभावाखाली निवडणूक लढवली जाईल, असे स्पष्ट केले आहे. विरोधी पक्षांच्या 'पीडीए' (PDA) समीकरणाला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी विकास आणि जनकल्याणकारी योजनांचा अजेंडा घराघरापर्यंत पोहोचवण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
संसदेतील भूमिका आणि भावी आव्हाने
सध्या महाराष्ट्रातून राज्यसभेचे खासदार असणारे विनोद तावडे संसदेच्या वित्तविषयक स्थायी समिती आणि परराष्ट्र मंत्रालयाच्या सल्लागार समितीवरही कार्यरत आहेत. प्रशासकीय आणि संघटनात्मक कामाचा दीर्घ अनुभव असलेल्या तावडेंच्या नेतृत्वाखाली भाजप उत्तर प्रदेशातील आव्हानांवर मात करून पुन्हा एकदा मुसंडी मारणार का, याकडे संपूर्ण देशाचे राजकीय लक्ष लागले आहे.
हेही वाचा – Sanjay Raut : "अजित पवारांचे पुरावे गाडीने फिरवण्याचे नाटक कोणी केले?" संजय राऊतांचा रोख नेमका कोणाकडे?