Kerala New CM : व्ही.डी. सतीशन होणार केरळचे नवे मुख्यमंत्री; काँग्रेस हायकमांडकडून नावावर शिक्कामोर्तब

सलग 10 दिवस चाललेल्या सखोल विचारमंथनानंतर अखेर सतीशन यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले असून, या निर्णयामुळे केरळ काँग्रेसमध्ये नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.

Kerala New CM : व्ही.डी. सतीशन होणार केरळचे नवे मुख्यमंत्री; काँग्रेस हायकमांडकडून नावावर शिक्कामोर्तब

Kerala New CM : केरळच्या राजकीय वर्तुळात गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या सत्तासंघर्षाला आता पूर्णविराम मिळाला आहे. काँग्रेस नेते व्ही.डी. सतीशन यांची केरळचे नवे मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती करण्याचा ऐतिहासिक निर्णय पक्षश्रेष्ठींनी घेतला आहे. सलग 10 दिवस चाललेल्या सखोल विचारमंथनानंतर अखेर सतीशन यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले असून, या निर्णयामुळे केरळ काँग्रेसमध्ये नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. विरोधी पक्षनेता म्हणून काम केलेल्या या अनुभवी नेत्याच्या हाती आता सत्तेची सुत्रं येणार आहेत.   

तगड्या स्पर्धेत सतीशन यांनी मारली बाजी
मुख्यमंत्रीपदाच्या या शर्यतीत व्ही.डी. सतीशन आणि काँग्रेसचे प्रभावी नेते के.सी. वेणुगोपाल यांच्यात चुरशीची स्पर्धा पाहायला मिळाली. मात्र, केरळमधील स्थानिक राजकारणातील पकड आणि आमदारांचा पाठिंबा लक्षात घेता हायकमांडने सतीशन यांच्या पारड्यात आपले वजन टाकले. गुरुवारी दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत मुकुल वासनिक, दीपा दास मुन्शी आणि अजय माकन यांनी त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली.

व्हीडी सतीशन यांची राजकीय कारकीर्द
कोची जवळील नेत्तूर येथे जन्मलेले व्ही.डी. सतीशन यांचा वारसा काँग्रेस विचारसरणीचा आहे. त्यांनी आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात ‘केरळ स्टुडंट्स युनियन’ (KSU) मधून केली. व्यवसायाने वकील आणि सामाजिक कार्यकर्ते असलेल्या सतीशन यांनी पक्षात अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने आपली जागा निर्माण केली आहे. 2001 पासून ते ‘परावूर’ विधानसभा मतदारसंघाचे सातत्याने प्रतिनिधित्व करत असून, तब्बल सहा वेळा आमदार म्हणून त्यांनी आपली लोकप्रियता सिद्ध केली आहे.

सतीशन यांच्या निवडीमागची महत्त्वाची कारणे
पक्षाने त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यामागे काही ठोस कारणे आहेत. सहा वेळा आमदार आणि विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी बजावलेली प्रभावी भूमिका त्यांचा राजकीय अनुभव सिद्ध करते. एक स्पष्टवक्ते प्रवक्ते म्हणून त्यांनी सरकारला अनेकदा धारेवर धरले असून, सामान्य जनतेचे प्रश्न मांडण्यात ते आघाडीवर राहिले आहेत. ग्रासरूट पॉलिटिक्सवर त्यांची मजबूत पकड असून, कार्यकर्त्यांमध्ये त्यांचा मोठा आदर आहे. केरळ काँग्रेसमधील गटातटाच्या राजकारणात सर्वांना सोबत घेऊन चालण्याची त्यांची क्षमता पक्षासाठी फायदेशीर ठरणार आहे.

हेही वाचा – India Bans Sugar Exports : भारतातील साखर निर्यातीवर बंदी; साखरेच्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारचा निर्यण

राजकीय वळण आणि नवी जबाबदारी
केरळमध्ये काँग्रेसला पुन्हा एकदा ऊर्जितावस्थेत आणण्याचे मोठे आव्हान आता सतीशन यांच्यासमोर असेल. विरोधी पक्षनेते ते मुख्यमंत्री असा त्यांचा हा प्रवास केरळच्या आगामी राजकारणाची दिशा ठरवणारा ठरेल. त्यांच्या निवडीनंतर राज्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा करण्यास सुरुवात केली असून, लवकरच त्यांचा शपथविधी सोहळा पार पडण्याची शक्यता आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number