मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार मनसे नेते अविनाश जाधव आणि संदीप देशपांडे यांनी मनसेचे कोकणातील नेते आणि खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह राजापूर, रत्नागिरीचे अविनाश सौंदळकर, चिपळूण, रत्नागिरीचे संतोष नलावडे, माणगाव, रायगडचे सुबोध जाधव यांना पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे पक्षातून बडतर्फ केले असल्याचे पत्राद्वारे जाहीर केले. त्यानंतर अस्वस्थ झालेले वैभव खेडेकर हे कुठल्या पक्षात प्रवेश करतात? याची उत्सुकता लागलेली होती.
खेडेकर यांनी म्हणाले की, "ज्या पक्षासाठी 20 वर्ष जीवाचे रान करून एकनिष्ठ राहिलो. त्याच पक्षाने बडतर्फीच्या कारवाईने निष्ठेचे फळच दिले असे खेडेकर यांनी म्हटले. बडतर्फी आदेश निघताच खेडेकर यांनी ही भावना बोलून दाखवली. गणेशोत्सव दरम्यान कोकणातील मंत्री नितेश राणे यांची भेट घेऊन त्यांनी भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार 4 सप्टेंबर रोजी नरीमन पॉईंट, मुंबई येथील भाजपा प्रदेश कार्यालयात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह अन्य नेत्यांच्या उपस्थितीत भाजपात पक्षप्रवेश होणार असल्याचे जाहीर केले होते.
वैभव खेडेकर अनेक कार्यकर्त्यांसह पक्षप्रवेशाची तयारी करत असताना मराठा आंदोलन सुरु असल्याने त्यांचा पक्षप्रवेश पुढे ढकलला. तसेच भाजपा नते तथा खासदार नारायण राणे यांची तब्येत देखील त्या दरम्यान बिघडलेली होती. यामुळे पक्षप्रवेश पुढे ढकलण्यात आला होता. याच कारणांमुळे खेडेकर यांचा पक्षप्रवेश लांबणीवर गेला होता.
मनसे नेते वैभव खेडेकर यांच्या पक्षप्रवेशाचा मुहूर्त कधी निघतो? या उत्सुकता सर्व समर्थकांना लागली आहे. मंगळवारी दुपारी 3 वाजता पक्षप्रवेशाचे फ्लेक्स लागलेले पाहायला मिळाले. यानुसार वैभव खेडेकर मुंबईत दाखल झाले. मात्र भाजपा कार्यालयाकडून पक्षप्रवेशाच्या प्रेस नोट निघालेली नव्हती. दरम्यान वैभव खेडेकर रवींद्र चव्हाण यांच्या रायगड बंगल्यावर गेलेय पण त्या ठिकाणी कर्मचारी होते. कोणताही मोठा नेता त्या ठिकाणी नव्हता. स्वत: रवींद्र चव्हाण देखील तेथे नव्हते.
मंत्रिमंडळ बैठकीनंतर मंत्री नितेश राणे हे दिल्लीला केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे कामानिमित्त निघून गेले. त्यानंतर मात्र वैभव खेडेकर आणि त्यांच्या समर्थकांची अस्वस्थता पाहायला मिळाली. प्रवेशाची जय्यत तयारी करून मुंबईत येऊन सुद्धा जर पक्षप्रवेश होत नसेल तर नेमकं होतंय काय? हा प्रश्न पडतोच.
वैभव खेडेकरांच्या पक्षप्रवेशामागे मोठ्या हालचाली घडतायत, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. मुंबईतील एका बड्या प्रादेशिक पक्षाचा नेता वैभव खेडेकर यांचा भाजप पक्षप्रवेश होऊ नये यासाठी काम करत असल्याचेही विश्वसनीय सूत्रांनी सांगितले आहे. कोकणातील नेते वैभव खेडेकर यांचा भाजप पक्षप्रवेश रखडलेला आहे. वैभव खेडेकर यांचा भाजप प्रवेश नक्की कधी होतो? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.