Suraj Chavan Emotional Post : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे केवळ राजकीयच नव्हे, तर कलाविश्वातूनही अत्यंत हृदयद्रावक प्रतिक्रिया उमटत आहेत. यात सर्वात भावूक श्रद्धांजलीची पोस्ट बिग बॉस मराठीचा विजेता सूरज चव्हाण याने लिहिली आहे. अजितदादांच्या निधनाचे वृत्त समजताच सूरजला अश्रू अनावर झाले असून त्याने सोशल मीडियावर आपली व्यथा मांडली आहे. “माझ्यासाठी अजितदादा हे केवळ नेते नव्हते, तर आई-वडिलांनंतर आधार देणारा देव माणूस होते,” अशा शब्दांत त्याने शोक व्यक्त केला आहे.
सूरजची भावूक पोस्ट: “आज मी पोरका झालो”
सूरज चव्हाणने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “मित्रांनो आज माझा देव चोरला… मला अजिबात विश्वास बसत नाहीये की आपले लाडके कार्यसम्राट अजितदादा आपल्यात नाहीत. माझ्यासारख्या गरीब मुलाला त्यांनी सोन्यासारखं घर बांधून दिलं, माझी काळजी घेतली आणि मला नवीन आयुष्य मिळवून दिलं. दादांसारखा देव माणूस या जगात नाही. आई-अप्पानंतर त्यांनी माझ्यासाठी जे केलं, त्याची आठवण मी आयुष्यभर काळजात जपून ठेवेन. दादा, तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली!”
शब्द पाळणारा ‘लोकनेता’
सूरज चव्हाण आणि अजित पवार यांचे नाते एका लोकनेत्याचे आणि सामान्य कार्यकर्त्याचे नव्हते, तर ते एका कुटुंबासारखे होते. सूरज चव्हाण बारामतीतील मोढवे गावचा रहिवासी आहे. जेव्हा सूरजने ‘बिग बॉस’चे विजेतेपद पटकावले, तेव्हा अजितदादांनी त्याचे कौतुक करताना त्याला हक्काचे घर बांधून देण्याचा शब्द दिला होता. दरम्यान, दादांनी केवळ शब्द दिला नाही, तर वर्षभराच्या आत घराचे काम पूर्ण करून घेतले. घराचे बांधकाम कसे सुरू आहे, याकडे ते स्वतः जातीने लक्ष देत असतं. काही महिन्यांपूर्वीच सूरज आपल्या नवीन घरात राहायला गेला होता. मात्र, घराचे काम पूर्ण झाल्यानंतर दादांनी त्या घराला भेट द्यायची इच्छा व्यक्त केली होती, जी आज अपूर्णच राहिली.
गरीब मुलाचा आधारस्तंभ निखळला
सूरजसाठी अजित पवार हे एका वडिलधार्या व्यक्तीप्रमाणे होते. त्याने अनेकदा जाहीरपणे सांगितले होते की, आज तो ज्या स्थितीत आहे, त्याचे श्रेय दादांना जाते. आज आपल्या लाडक्या ‘दादां’ना गमावल्यामुळे सूरज चव्हाणसह हजारो गोरगरीब कार्यकर्त्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.