INS Mahe: भारतीय नौदलाची शक्ती आणखी वाढली असून ‘INS माहे’ या अत्याधुनिक पाणबुडीविरोधी युद्धनौकेचा सोमवारी अधिकृत ताफ्यात समावेश झाला. मुंबईतील नौदल डॉकयार्ड येथे लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्या उपस्थितीत हा कमिशनिंग सोहळा पार पडला. उथळ पाण्यात शत्रूच्या पाणबुड्यांचा शोध घेण्यासाठी आणि त्यांचा नायनाट करण्यासाठी खास तयार केलेली ही पहिलीच माहे-वर्गातील युद्धनौका असून, तिची ‘शत्रूच्या पाणबुड्यांची शत्रू’ अशी ओळख आहे.
80 टक्के स्वदेशी तंत्रज्ञान
INS माहे ही उथळ पाण्यातील युद्धनौकांच्या नवीन पिढीची सुरुवात मानली जात आहे. तिच्या बांधकामात 80 टक्क्यांपेक्षा जास्त स्वदेशी साहित्य आणि तंत्रज्ञानाचा वापर केला गेला आहे. हे भारताच्या नौदल अभियांत्रिकीतील वाढत्या कौशल्याचे प्रतिक मानले जात असून, कोचीन शिपयार्डमध्ये बांधण्यात आलेले हे पहिले जहाज आहे, जे पूर्णपणे भारतीय गरजेनुसार डिझाइन करण्यात आले आहे. ही युद्धनौका पश्चिम किनारपट्टीवर ‘मूक शिकारी’ची भूमिका निभावणार असून, शत्रूच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्याची क्षमता यात आहे.
हेही वाचा – Weather Update: हवामानात मोठा उलटफेर! दोन वादळांचा धोका, दक्षिणेत मुसळधार पाऊस; महाराष्ट्रात काय परिणाम?
शत्रूच्या पाणबुड्यांसाठी घातक
INS माहे ही 78 मीटर लांबीचे युद्धनौका असून, त्यामध्ये अत्याधुनिक सोनार प्रणाली बसवण्यात आली आहे. ही यंत्रणा उथळ पाण्यातही पाणबुड्यांचा अचूक शोध घेते, त्यांचा मागोवा ठेवते आणि आवश्यक असल्यास हल्ला करण्याची क्षमता दाखवते.
INS माहेची वैशिष्ट्ये:
आधुनिक सोनार यंत्रणा
पाणबुडीविरोधी शस्त्रास्त्र प्रणाली
उथळ पाण्यात गुप्त आणि वेगवान हालचाल
मल्टि-मिशन ऑपरेशन्सची क्षमता
80 टक्के स्वदेशी तंत्रज्ञान
भारतीय नौदलाची भविष्यातील रणनीती अधिक सक्षम करण्यासाठी ‘माहे-वर्ग’ निर्णायक ठरेल, असा विश्वास तज्ञांनी व्यक्त केला आहे. जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी सांगितलं की, INS माहे हे केवळ एका नव्या युद्धनौकेचे कमिशनिंग नाही, तर भारताच्या तांत्रिक प्रगतीचा आणि स्वदेशी क्षमतेच्या वाढीचा जिवंत पुरावा आहे. हे जहाज देशाच्या किनारी सुरक्षेला अभेद्य कवच देईल.
समुद्री सुरक्षेत नवा अध्याय
INS माहे ताफ्यात दाखल झाल्याने भारतीय नौदलाच्या पश्चिम किनारपट्टीवरील गस्त, किनारी सुरक्षा आणि पाणबुडीविरोधी ऑपरेशन्सला मोठी धार मिळाली आहे. पुढील काही वर्षांत या वर्गातील आणखी सात जहाजे नौदलात दाखल होणार आहेत.