Ajit Pawar Death : महाराष्ट्राच्या राजकारणातील एक कणखर नेतृत्व, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाचे वृत्त समजताच केवळ राजकीय क्षेत्रच नव्हे, तर क्रीडा विश्वही सुन्न झाले आहे. बारामती येथील विमान अपघातात दादांचे निधन झाल्याची अधिकृत पुष्टी झाल्यानंतर, भारतरत्न सचिन तेंडुलकरसह अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
“महाराष्ट्राने समर्पित नेता गमावला” – सचिन तेंडुलकर
क्रिकेटचा देव मानल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरने इन्स्टाग्रामवर एक भावूक पोस्ट शेअर केली आहे. सचिनने लिहिले, “महाराष्ट्राने आज एक समर्पित आणि कार्यतत्पर नेता गमावला आहे. त्यांनी संपूर्ण राज्याच्या विकासासाठी दिलेले योगदान अमूल्य आहे. या कठीण प्रसंगी त्यांच्या कुटुंबाप्रती माझ्या सहवेदना आहेत. ओम शांती.”
अजित पवार यांच्या निधनाची बातमी ऐकून खूप दुःख झाले. महाराष्ट्रासाठी काम करणारा एक चांगला नेता आज आपण अचानक गमावला आहे. पवार कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.
भावपूर्ण श्रद्धांजली. ॐ शांती. ?? Very sad to learn about the untimely demise of… — Sachin Tendulkar (@sachin_rt) January 28, 2026
रहाणे आणि अझरुद्दीन यांनी व्यक्त केला शोक
भारतीय क्रिकेट संघातील अनुभवी खेळाडू अजिंक्य रहाणे यानेही दादांच्या निधनावर दुःख व्यक्त केले. “अजित पवार दादांच्या निधनाची बातमी अत्यंत धक्कादायक आहे. माझ्या प्रार्थना त्यांच्या कुटुंबासोबत आहेत,” असे रहाणेने म्हटले आहे. तर माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांनी या घटनेला ‘न भरून येणारं नुकसान’ संबोधत पवार कुटुंबाला हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, अशी प्रार्थना केली.
युसूफ पठाण यांच्याकडून कार्याचा गौरव
माजी क्रिकेटपटू आणि खासदार युसूफ पठाण यांनीही ट्विट करत श्रद्धांजली वाहिली. ते म्हणाले की, “श्री. अजित पवार यांनी अत्यंत प्रामाणिकपणे आणि निष्ठेने राज्याची सेवा केली. सार्वजनिक सेवा आणि विकासातील त्यांचे योगदान महाराष्ट्र कधीही विसरणार नाही.”
दुर्घटना नेमकी काय होती?
दरम्यान, आज सकाळी 8:45 च्या सुमारास, आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचार सभेसाठी अजित पवार बारामतीकडे निघाले होते. त्यांचे ‘VT-SSK’ हे खाजगी विमान बारामती विमानतळावर उतरत असताना भीषण अपघाताचा बळी ठरले. या दुर्घटनेत अजितदादांसह दोन सहकारी आणि दोन क्रू मेंबर्स अशा एकूण पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) या वृत्ताला दुजोरा दिला असून संपूर्ण राज्यात आज शोककळा पसरली आहे.