Uddhav Thackeray: ‘आम्ही ज्याला वाघ समजत होतो, तो तर लांडगा निघाला…’; उद्धव ठाकरेंची ओमराजेंवर घणाघाती टीका

धाराशिव येथे आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत उद्धव ठाकरे यांनी स्थानिक खासदार ओमराजे निंबाळकर आणि भारतीय जनता पक्षावर जोरदार हल्ला चढवला.

Uddhav Thackeray: ‘आम्ही ज्याला वाघ समजत होतो, तो तर लांडगा निघाला…’; उद्धव ठाकरेंची ओमराजेंवर घणाघाती टीका

Uddhav Thackeray: शिवसेना ठाकरे गटातील 6 खासदारांच्या पक्षांतरानंतर राज्याचे राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. बंडखोर खासदारांना त्यांच्याच मतदारसंघात थेट आव्हान देण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी झंझावाती दौरे सुरू केले आहेत. याच पार्श्वभूमीवर धाराशिव येथे आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत उद्धव ठाकरे यांनी स्थानिक खासदार ओमराजे निंबाळकर आणि भारतीय जनता पक्षावर जोरदार हल्ला चढवला. आपल्या या सभा राजकीय नसून कौटुंबिक बैठका आहेत, असे स्पष्ट करत त्यांनी विरोधकांना इशारा दिला की, त्यांनी कितीही लोक फोडले तरी धाराशिवमध्ये पुन्हा भगवा फडकवल्याशिवाय आपण शांत बसणार नाही.

'वाघाच्या कातड्यातील लांडगा'; ओमराजेंच्या गद्दारीवर ठाकरेंचा घणाघात
खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर सडकून टीका करताना उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या जुन्या भाषणांची आठवण करून दिली. इतिहासामध्ये खंडोजी खोपडे आणि सूर्याजी पिसाळ यांचे नाव ज्या कुप्रसिद्धीने घेतले जाते, तसाच गद्दारीचा शिक्का आता ओमराजेंच्या कपाळावर बसला असून तो कधीही पुसला जाणार नाही, असा टोला त्यांनी लगावला. निवडणुकीच्या काळात एका गरीब शेतकऱ्याने स्वतःचे पैसे या खासदाराला दिले होते, हा किस्सा सांगत ठाकरेंनी ओमराजेंची नक्कलही केली. "प्रचारादरम्यान मी ज्यांना माझे 2 वाघ म्हटले होते, त्यापैकी हा वाघाचे कातडे पांघरलेला लांडगा निघाला," अशा अत्यंत तीक्ष्ण शब्दांत त्यांनी ओमराजेंचा समाचार घेतला. तर दुसरीकडे, स्थानिक आमदार कैलास पाटील यांनी शेवटच्या श्वासापर्यंत उद्धव ठाकरेंसोबत एकनिष्ठ राहण्याची शपथ घेतली.

'ऑपरेशन देवेंद्र' आणि 2029 चे गणित; भाजपच्या अंतर्गत वादावर भाष्य
या सभेत उद्धव ठाकरेंनी भाजपच्या अंतर्गत राजकारणावर आणि 'मिंधे गटात' सामील झालेल्या खासदारांच्या भूमिकेवर मोठा दावा केला. हे खासदार केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी गेले नसून, भाजपमध्ये अंतर्गत पातळीवर 'ऑपरेशन देवेंद्र' सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. देवेंद्र फडणवीस हे दिल्लीचे स्वप्न पाहत असून, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) देखील त्यांना पंतप्रधानपदासाठी पाठिंबा देऊ शकतो, असा दावा ठाकरेंनी केला. आगामी काळात फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदाची खुर्ची काढून घेतली तरी आश्चर्य वाटायला नको, असे सांगत ठाकरे म्हणाले की, 2029 पर्यंत पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असणाऱ्या इतर नेत्यांचे पत्ते कट करण्यासाठीच या खासदारांना बाजूला ठेवून अंतर्गत खेळी खेळली जात आहे.

हेही वाचा – Uday Samant: 'ज्यांनी बाळासाहेबांचे विचार विकले, त्यांनी गद्दारीबद्दल बोलू नये…'; उदय सामंत यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

500 कोटींचे भूखंड आणि ईडीची भीती; संजय राऊतांचे गंभीर आरोप
दरम्यान, उद्धव ठाकरेण्यांपूर्वी शिवसेना नेते संजय राऊत यांनी ओमराजे निंबाळकर यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करत धारदार टीका केली. ओमराजेंना 'भामटा आणि सोंगाड्या' संबोधत राऊत म्हणाले की, हा केवळ भीतीपोटी शिंदे गटात पळून गेला आहे. पवनराजे मल्टिस्टेट कंपनीच्या माध्यमातून संपूर्ण धाराशिवमध्ये 500 कोटी रुपयांचे बेकायदेशीर भूखंड खरेदी केल्याचा आरोप राऊतांनी केला. या कथित घोटाळ्याची सक्तवसुली संचालनालयाकडून (ED) चौकशी सुरू झाल्यामुळेच त्यांनी पक्षांतर केले. गरिबांच्या नावाने बनावट खाती उघडून कोट्यवधी रुपयांचा अपहार केल्याचा आणि कारखान्यातील साहित्य विकून पैसे खाल्ल्याचा आरोप करत राऊतांनी यावेळी केला.  
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number