Prithviraj Chavan : ‘सुनेत्रा पवार कृतीतून उत्तर देतील…’; ‘गुंगी गुडिया’ वादानंतर पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचे टोचले कान

प्रदेश काँग्रेसच्या सोशल मीडिया हँडलवरून सुनेत्रा पवार यांच्यावर 'गुंगी-गुडिया' अशी वैयक्तिक टिप्पणी करण्यात आली होती.

Prithviraj Chavan : ‘सुनेत्रा पवार कृतीतून उत्तर देतील…’; ‘गुंगी गुडिया’ वादानंतर पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचे टोचले कान

Prithviraj Chavan : बीड दौऱ्यादरम्यान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या पत्रकार परिषदेतील एका व्हिडिओवरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राजकीय कलगीतुरा रंगला आहे. प्रदेश काँग्रेसच्या सोशल मीडिया हँडलवरून सुनेत्रा पवार यांच्यावर 'गुंगी-गुडिया' अशी वैयक्तिक टिप्पणी करण्यात आली होती. या प्रकारानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याविरोधात निदर्शने सुरू केली. या संपूर्ण वादावर अखेर पृथ्वीराज चव्हाण यांनी ट्विट करत आपली भूमिका स्पष्ट केली असून कार्यकर्त्यांनी पूर्ण माहिती न घेता आंदोलन करू नये, असा सल्ला दिला आहे.

अंजली दमानियांचा फोन अन् चव्हाणांचे स्पष्टीकरण; वादात मुख्यमंत्र्यांवर निशाणा
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या भाषेवर तीव्र आक्षेप घेत थेट पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी संपर्क साधला होता. या संदर्भात बोलताना चव्हाण म्हणाले की, संबंधित पोस्टशी त्यांचा कोणताही थेट संबंध नाही, तरीही पक्षाचा वरिष्ठ नेता म्हणून त्यांनी या प्रकरणाची माहिती घेण्याचे आश्वासन दिले होते. बीडमधील कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नावर उत्तर न देता पत्रकार परिषद आटोपल्यामुळे ही टीका झाली असली, तरी कोणत्याही महिलेबद्दल अशी भाषा वापरणे टाळायला हवे होते, असे मत त्यांनी व्यक्त केले. याच वेळी त्यांनी बीडमधील बिघडलेल्या कायदा-सुव्यवस्थेला थेट मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना जबाबदार धरले.

हेही वाचा – Sunetra Pawar: 'गुंगी गुडिया' वादावर अखेर सुनेत्रा पवार यांची प्रतिक्रिया; एका वाक्यात केली विरोधकांची बोलती बंद

राममनोहर लोहिया आणि इंदिरा गांधींच्या प्रसंगाची आठवण; 'सुनेत्रा पवार कृतीतून उत्तर देतील'
राजकारणात महिलांना प्रोत्साहन देणे गरजेचे असल्याचे सांगत पृथ्वीराज चव्हाण यांनी दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या ऐतिहासिक प्रसंगाचा दाखला दिला. भूतकाळात डॉ. राममनोहर लोहिया यांनी इंदिरा गांधींबाबत असाच शब्दप्रयोग केला होता, परंतु इंदिराजींनी आपल्या कार्यातून त्यांना चोख उत्तर दिले होते. आज सुनेत्रा पवार राज्याच्या महत्त्वाच्या घटनात्मक पदावर कार्यरत आहेत, त्यामुळे त्यांच्यावर पातळी सोडून टीका करणे अयोग्य आहे. इंदिराजींप्रमाणेच सुनेत्रा पवारसुद्धा आपल्या कौशल्याने आणि कृतीतूनच या टीकेला उत्तर देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number