Rahul Gandhi: संसदेच्या चालू अधिवेशनादरम्यान विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमधील राजकीय वाद चांगलाच पेटला आहे. काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राहुल गांधी यांनी अमित शाह यांच्या संसदेतील गैरहजेरीवर गंभीर प्रश्न उपस्थित करत, ते आपली कर्तव्ये पार पाडण्यात पूर्णपणे अपयशी ठरत असल्याचा थेट आरोप केला.
अमित शाह 20 दिवसांपासून संसदेत आलेच नाहीत
माध्यमांशी बोलताना राहुल गांधी यांनी अमित शाह यांच्या अनुपस्थितीवर बोट ठेवले. ते म्हणाले की, गेल्या 20 दिवसांपासून गृहमंत्री अमित शाह संसदेत आलेलेच नाहीत. रोज त्यांच्या गाड्यांचा ताफा संसदेत येत होता, मात्र गृहमंत्री स्वतः सभागृहात उपस्थित राहिले नाहीत. देश आणि संसदेप्रती असलेल्या आपल्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्ये पार पाडण्यात गृहमंत्री अपयशी ठरत असल्याचे यावरून स्पष्ट होते, असा घणाघात राहुल गांधी यांनी केला.
‘प्रसारमाध्यमांनी घाबरू नये, विद्यार्थ्यांना उत्तर द्या’
यावेळी राहुल गांधी यांनी प्रसारमाध्यमांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केले. “तुम्ही सतत आम्हाला अडवता आणि प्रश्न विचारता, मग तुम्ही त्यांना (सत्ताधाऱ्यांना) का अडवत नाही? त्यांना प्रश्न का विचारत नाही?” असा सवाल त्यांनी पत्रकारांना केला. पुढे राहुल गांधी म्हणाले, “त्यांच्यात असे काय विशेष आहे की संपूर्ण प्रसारमाध्यमे गप्प बसतात? जर देशातील विद्यार्थी घाबरत नाहीत, तर तुम्ही का घाबरता? तुम्हीही घाबरू नका आणि आपली भूमिका निर्भयपणे मांडा.”