Sonam Wangchuk Statement about Support to CJP: दिल्लीतील जंतर-मंतर येथे कॉकरोच जनता पार्टीने केलेल्या आंदोलनाला सामाजिक आणि पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी पाठिंबा दिला होता. अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनाला सोनम वांगचुक यांच्या उपोषणामुळे मोठे बळ मिळाले होते. हे आंदोलन यशस्वी झाल्यानंतर आता ही जोडी पुन्हा एकत्र दिसणार का, याबद्दल चर्चा रंगू लागली आहे. यावर आता सोनम वांगचुक यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
मुलाखतीत केला मोठा खुलासा
एका यूट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत सोनम वांगचुक यांनी या आंदोलनामागील पार्श्वभूमी सांगितली. CJP ला पाठिंबा देण्यापूर्वी आणि नंतर घडलेल्या घडामोडींवर त्यांनी काही मुद्दे मांडले:
– लडाखचे उपराज्यपाल व्ही. के. सक्सेना यांनी CJP च्या मागे पाकिस्तान आणि अमेरिका यांसारख्या परदेशी शक्तींचा हात असल्याचा दावा केला होता.
– उपराज्यपाल यांच्या सूचनेनंतर वांगचुक यांनी CJP पक्षाबद्दल अधिक माहिती गोळा केली आणि अभिजीत दीपके यांच्याशी थेट संपर्क साधला.
– दीपके यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर या आंदोलनामागे कोणतीही परदेशी शक्ती नसून त्यांची भूमिका योग्य असल्याचे वांगचुक यांच्या लक्षात आले.
– अभिजीत दीपके भारतात आल्यावर त्यांना अटक झाल्यास आपण उपोषणाला बसू, असा इशाराही त्यांनी दिला होता आणि त्यानंतर त्यांनी आंदोलनात सहभाग घेतला.
स्वतःला म्हटले 'ऑनररी कॉकरोच'
CJP च्या आंदोलनात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या वांगचुक यांनी हलक्याफुलक्या अंदाजात स्वतःला ऑनररी कॉकरोच असल्याचे म्हटले. मात्र, आपले वय अधिक असल्यामुळे आणि आपण आळशी नसल्याने कॉकरोच बनण्याच्या पात्रतेत बसत नसल्याची मिश्कील टिप्पणीही त्यांनी केली. चांगल्या मुद्द्यांसाठी आपली गरज भासल्यास भविष्यातही समर्थन देण्यास तयार असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.
भविष्यातील भूमिकेवर स्पष्टीकरण
CJP सोबत आगामी आंदोलनांमध्ये सहभागी होणार का, या प्रश्नावर बोलताना त्यांनी देश किंवा जगातील कोणत्याही चांगल्या मुद्द्याला आपला पाठिंबा कायम राहील असे सांगितले. लडाखच्या प्रश्नांपासून ते जंतर-मंतरवरील आंदोलनापर्यंत विविध मुद्द्यांवर आपण नेहमीच हिरिरीने सहभागी झालो असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
लडाखमधील लोकशाही आणि सुरक्षेचा मुद्दा
लडाखमध्ये लोकशाही पुन्हा प्रस्थापित होणे आणि सुरक्षेशी संबंधित सर्व उपाययोजना लागू होणे हे आपले प्राथमिक ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले. हे प्रश्न सुटल्यानंतर लडाखमधील आपली भूमिका कदाचित संपेल आणि त्यानंतर आपण इतर सामाजिक मुद्द्यांकडे लक्ष केंद्रित करू, असे स्पष्ट करत त्यांनी आपल्या आगामी वाटचालीचे संकेत दिले.