Shweta Tiwari : प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारी हिने सोशल मीडियावर महिलांविरोधात होणाऱ्या अत्यंत खालच्या पातळीवरील टिपण्या आणि ऑनलाइन ट्रोलिंगवर तीव्र शब्दांत ताशेरे ओढले आहेत. स्वतःला 'मराठी माणूस' आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे कट्टर समर्थक म्हणवून घेणारे काही युजर्स इन्स्टाग्रामवर अत्यंत घाणेरड्या आणि अश्लील भाषेत शिवीगाळ करत असल्याचे श्वेताने उघड केले आहे. या संपूर्ण प्रकारामुळे अत्यंत व्यथित झालेल्या श्वेताने संबंधित ट्रोल्सच्या अकाऊंट्सचे स्क्रीनशॉट्स शेअर करत या विकृत मानसिकतेवर तातडीने कठोर भाष्य केले आहे.
'सुशिक्षित पुरुषांची ही कसली विकृती?'
इन्स्टाग्राम स्टोरीवर आपली भूमिका मांडताना श्वेताने लिहिले की, "आज मला एका अत्यंत संवेदनशील परंतु सोशल मीडियावर अतिशय सर्रास घडणाऱ्या मुद्द्यावर बोलायचे आहे. कोणत्याही वयातील किंवा कोणत्याही क्षेत्रातील स्त्री असो, तिला अगदी सहजपणे अत्यंत अश्लील आणि अपशब्द वापरून हिणवले जाते. धक्कादायक बाब म्हणजे, असा घाणेरडा प्रकार करणारे लोक कोणी निरक्षर किंवा गुन्हेगार नाहीत. ते सुशिक्षित आणि चांगल्या घरातील दिसतात, ज्यांच्या स्वतःच्या घरात आई, बहीण, पत्नी आणि मुलगी आहे. तरीही ते इतर महिलांसाठी अशी विकृत भाषा वापरतात."
महाराष्ट्रातील संस्कृती अन् राज ठाकरेंना थेट सवाल
आपल्या भावना व्यक्त करताना श्वेता पुढे म्हणाली की, तिचे संपूर्ण बालपण महाराष्ट्रात गेले असून तिचे वडीलही मुंबईतच मोठे झाले आहेत. त्यामुळे महाराष्ट्राची संस्कृती ही नेहमीच स्त्रियांचा आदर करणारी आणि त्यांच्या कर्तृत्वाला सन्मान देणारी आहे, याच विश्वासावर ती मोठी झाली आहे. मात्र, स्वतःला अभिमानाने 'मराठी माणूस' म्हणवून घेणारे लोक जेव्हा महिलांच्या मेसेज बॉक्समध्ये जाऊन अश्लील भाषेत शिवीगाळ करतात, तेव्हा 'मराठी माणूस' या अस्मितेचा हाच अर्थ उरला आहे का, असा सवाल तिने केला. यासोबतच, तिने थेट मनसेप्रमुख राज ठाकरे यांना उद्देशून लिहिले की, "राज ठाकरेजी, जर महिलांना अश्लील शिवीगाळ करणारे हे लोक तुमचे समर्थक असतील, तर त्यांचे हे हिडीस वर्तन तुम्हाला खरोखरच मान्य आहे का? कारण केवळ मराठी बोलणे, स्वतःला मराठी माणूस म्हणवणे किंवा महाराष्ट्रावर प्रेम असल्याचा दावा करणे म्हणजे संस्कृती जपली असे होत नाही."
'प्रत्येक स्त्रीचा आदर करा'
आपल्या संदेशाच्या शेवटी श्वेताने सर्वांनाच विचार करायला लावणारा सल्ला दिला आहे. ती म्हणाली की, एखादी महिला तुमच्या परिचयाची नाही, तुम्ही तिच्याशी सहमत नाही किंवा ती तुम्हाला आवडत नाही म्हणून तिला शिवीगाळ करण्याचा किंवा तिचा आदर कमी करण्याचा अधिकार कोणालाही मिळत नाही. केवळ स्वतःच्या घरातील किंवा आवडीच्या महिलांचाच नव्हे, तर समाजातील सर्वच स्त्रियांचा समान आदर केला पाहिजे, असे सांगत तिने या विकृत मानसिकतेविरोधात जोरदार आवाज उठवला आहे.