Sanjay Raut : शिवसेनेचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह कोणाचे? यावर सर्वोच्च न्यायालयात वादळी सुनावणी पार पडली. ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी कोर्टात जोरदार बाजू मांडली. निवडणूक आयोगाने मूळ राजकीय पक्षाचा विचार न करता केवळ विधिमंडळ पक्षातील संख्याबळाच्या आधारे निकाल कसा दिला, असा सवाल सिब्बल यांनी उपस्थित केला. पक्षाची घटना वैध आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला नाही, असा युक्तिवाद करत सिब्बल यांनी आयोगाच्या निर्णयावर बोट ठेवले. कोर्टातील या महत्त्वाच्या घडामोडींनंतर खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडियावर दिलेली प्रतिक्रिया सध्या राजकीय वर्तुळात प्रचंड चर्चेत आली आहे.
हेही वाचा – Arvind Kejriwal: ‘पंतप्रधानांसमोर इतके झुकू नका’ अरविंद केजरीवालांचा मेटावर गंभीर आरोप; नेमकं प्रकरण काय?
‘संविधानावर विश्वास, जय महाराष्ट्र!’; सोशल मीडियावरील पोस्ट तुफान व्हायरल
सुप्रीम कोर्टातील सुनावणीनंतर संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो शेअर करत एक रोखठोक पोस्ट प्रसिद्ध केली. “आमचा देशाच्या संविधानावर पूर्ण विश्वास आहे… यांचा खेळ कायदेशीर मार्गानेच आटोपतोय, याबाबत आमच्या मनात तीळमात्र शंका नाही! जय महाराष्ट्र!” असे राऊत यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. राऊतांचे हे ट्विट आणि फोटो सोशल मीडियावर अल्पावधीतच व्हायरल झाले असून, त्यावर नेटकऱ्यांकडून जोरदार प्रतिक्रिया उमटत आहेत.
आमचा देशाच्या संविधानावर विश्वास आहे!
यांचा खेळ कायदेशीर मार्गानेच आटोपतोय..या बाबत आमच्या मनात शंका नाही!
जय महाराष्ट्र! pic.twitter.com/m2u1htLgKs — Sanjay Raut (@rautsanjay61) August 6, 2026
‘शिवसेना पक्ष फुटलेलाच नाही’; धनुष्यबाण चिन्ह परत मिळण्याचा ठाकरे गटाला विश्वास
माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी स्पष्ट केले की, शिवसेना कधीच फुटलेली नाही आणि धनुष्यबाण चिन्ह अखेर ठाकरे गटाकडेच राहील. लोकशाहीच्या रक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयाने पुढाकार घेऊन कठोर बंधने घातली पाहिजेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत त्यांनी शिंदे गटावर कायदेशीर कारवाई होणारच असा दावा केला. कोर्टात आजही पुढील सुनावणी सुरू राहणार असून, सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.