Rohit Pawar: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पक्षसंघटनेबाबत मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या अत्यंत महत्त्वाच्या बैठकीस आमदार रोहित पवार अनुपस्थित राहिल्याने राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. पक्षाचे सर्वोच्च नेते शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही महत्त्वाची बैठक पार पडली. आगामी रणनीती आणि पक्षबांधणीच्या दृष्टिकोनातून बोलावण्यात आलेल्या या बैठकीला पक्षातील दिग्गज नेत्यांची उपस्थिती होती. परंतु, नेहमी राजकीय हालचालींमध्ये सक्रिय असणारे रोहित पवार अचानक गैरहजर राहिल्याने पक्षांतर्गत समीकरणांबाबत नव्याने तर्कवितर्क लावले जात आहेत.
महायुतीबाबतचे मतभेद अन् काँग्रेसशी जवळीक?; अनुपस्थितीचे राजकीय अर्थ काढण्यास सुरुवात
काही काळापासून रोहित पवार यांची काँग्रेस नेत्यांशी वाढती जवळीक आणि महायुतीसोबत (NDA) जाण्याच्या कोणत्याही शक्यतेला असणारा तीव्र विरोध, यामुळे ते पक्षाच्या काही निर्णयांवर नाराज असल्याची चर्चा आहे. शनिवारी झालेल्या या बैठकीस प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, जितेंद्र आव्हाड, अनिल देशमुख, खासदार निलेश लंके यांसारखे महत्त्वाचे शिलेदार हजर होते. सुमारे 10 दिवसांपूर्वी पार पडलेल्या जिल्हाध्यक्षांच्या बैठकीतील आढावा घेण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. रोहित पवार यांनी आपल्या अनुपस्थितीबाबत प्रदेशाध्यक्षांना पूर्वकल्पना दिली होती, असे सांगण्यात येत असले तरी राजकीय विश्लेषक याकडे वेगळ्या दृष्टीने पाहत आहेत.
विलिनीकरणाच्या बातम्या निव्वळ अफवा
दरम्यान, या बैठकीनंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलिनीकरणाच्या आणि एनडीएमध्ये सामील होण्याच्या चर्चेला उधाण आले होते. मात्र, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी यावर पडदा पाडत सर्व बातम्या फेटाळून लावल्या. "पक्ष विलिनीकरणाचा कोणताही प्रस्ताव आमच्यासमोर आलेला नाही आणि बैठकीत तशी कोणतीही चर्चा झालेली नाही," असे त्यांनी स्पष्ट केले. येत्या ऑक्टोबर महिन्यापासून राज्यभर धडक दौरे काढले जाणार असून, पक्षातील युवा नेतृत्वाला अधिक जबाबदाऱ्या देऊन संघटन मजबूत करण्यावरच संपूर्ण लक्ष केंद्रित केले जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.