महाराष्ट्राच्या राजकारणात ऑपरेशन टायगरची चर्चा रंगली असतानाच आता ठाकरे गटाचे खासदार हे शिवसेनेच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या 9 पैकी 6 खासदारांनी ठाकरेंची साथ सोडली असून स्वतःचा वेगळा गट निर्माण केला आहे.
सर्व खासदारांनी मंगळवारी रात्री दिल्लीत जाऊन नवीन गट स्थापन केला आहे. याला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी देखील मान्यता दिली आहे. या मान्यतेमुळे आता या गटाचा शिवसेना शिंदे गटात विलीन होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अशातच आता रवी राणा यांनी मोठं वक्तव्य केला आहे.
रवी राणा यांनी ठाकरे गटातील संभाव्य फुटीच्या चर्चांवर मोठं वक्तव्य केलं आहे. अमरावतीत प्रसारमाध्यमांशी बोलताना आमदार रवी राणा यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाबाबत मोठा दावा केला आहे. उबाटाचे दोन खासदार आपल्या संपर्कात असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच पक्षातील अनेक नेते आणि कार्यकर्ते नाराज असल्याचा आरोपही त्यांनी केला. आगामी काळात उबाटामध्ये फक्त उद्धव ठाकरे आणि संजय राऊतच उरतील, असा टोला रवी राणांनी लगावला. याचबरोबर उबाटाच्या सहाही खासदारांनी युवा स्वाभिमान पार्टीत प्रवेश करावा, असे आवाहनही त्यांनी केले. रवी राणांच्या या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.