Rahul Gandhi : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दिल्लीतील पत्रकार परिषदेत आक्रमक पवित्रा घेत भारतीय जनता पक्ष आणि आरएसएसच्या विचारधारेवर निशाणा साधला. महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात गाजलेल्या 'लाव रे तो व्हिडिओ' या शैलीत त्यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून उत्तराखंडमधील घटनेचा भांडाफोड केला. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या कार्यक्रमानंतर त्या व्यासपीठाचे प्रशासनाकडून शुद्धीकरण करण्यात आल्याचा गंभीर आरोप करत, ही अस्पृश्यतेची आधुनिक मानसिकता असल्याचे राहुल गांधी यांनी ठामपणे सांगितले.
'शुद्धीकरण' म्हणजेच अस्पृश्यतेचा प्रकार; उत्तराखंड सरकारने माफी मागण्याची मागणी
पत्रकार परिषदेत बोलताना राहुल गांधी म्हणाले की, "एकीकडे देशाचे पंतप्रधान सर्व घटकांना सोबत घेऊन चालण्याच्या गप्पा मारतात आणि दुसरीकडे दलितांचा आणि शोषित घटकांचा असा अनादर केला जातो." व्यासपीठ धुणे किंवा त्याचे शुद्धीकरण करणे हा केवळ प्रकार नसून तो संविधानाने बंदी घातलेल्या अस्पृश्यतेचाच एक भाग आहे. या प्रकरणी उत्तराखंड प्रशासनाने आणि सरकारने तात्काळ जाहीर माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच या घटनेत सहभागी असणाऱ्यांवर काँग्रेस पक्ष गप्प बसणार नसून संबंधितांवर एफआयआर (FIR) दाखल करून कायदेशीर लढा उभारला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा – Nepal Flood: आधी मदत नाकारली; आता नेपाळच्या बचावकार्यासाठी भारताचे 'हे' विशेष पथक काठमांडूत दाखल
दोन परस्परविरोधी विचारसरणींमधील लढा; न्यायालयाकडून न्यायाची अपेक्षा
देशात सध्या दोन भिन्न विचारधारांमध्ये संघर्ष सुरू असल्याचे सांगत राहुल गांधी म्हणाले की, एका बाजूला दलितांना व शोषितांना दुय्यम दर्जा देणारी मानसिकता आहे, तर दुसऱ्या बाजूला संविधानाचे रक्षण करणारा काँग्रेस पक्ष उभा आहे. शाळांमध्ये दलित विद्यार्थ्यांना झाडू मारायला लावण्यासारख्या विकृतींचा उल्लेख करत त्यांनी याविरोधात ठामपणे उभे राहण्याचा निर्धार व्यक्त केला. देशाच्या राष्ट्रपती दलित समाजातील असून या गंभीर प्रकरणात आम्हाला सर्वोच्च न्यायालय आणि राष्ट्रपती भवनातून नक्कीच न्याय मिळेल, असा विश्वास त्यांनी शेवटी व्यक्त केला. राहुल गांधींच्या या थेट पुराव्यांसह केलेल्या हल्ल्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.