Pune Municipal Elections: निवडणुकांच्या रणधुमाळीत पुणेरी टोला; ‘धर्म नको, विकासावर बोला’ असा नेत्यांना थेट संदेश

पुणे आणि मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पुणेरी बॅनरने नेत्यांना धार्मिक राजकारण टाळून वाहतूक, पाणी, रोजगार आणि महिला सुरक्षेसारख्या मूलभूत मुद्द्यांवर बोलण्

Pune Municipal Elections: निवडणुकांच्या रणधुमाळीत पुणेरी टोला; ‘धर्म नको, विकासावर बोला’ असा नेत्यांना थेट संदेश

Pune Municipal Elections: पुणे आणि मुंबई महानगरपालिकांच्या निवडणुकांचे वारे जोरात वाहू लागले आहेत. काही ठिकाणी उमेदवारांची यादी, युती-अयुती, तर कुठे शेवटच्या क्षणी पक्षांतर यामुळे राजकीय वातावरण तापलेलं दिसत आहे. १५ तारखेला मतदान असून मोजकेच जिल्हे उरले असताना विदर्भ, पुणे आणि मुंबई परिसरात मंत्री, आमदार आणि पक्षनेते प्रचारसभांचा धडाका लावत आहेत. या गदारोळातच पुण्यातून एक वेगळाच ‘पुणेरी’ आवाज सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

पुणे म्हटलं की डोळ्यासमोर येतात ती पुणेरी टोमणे, पाट्या आणि थेट प्रश्न विचारण्याची सवय. अशाच शैलीतील एक बॅनर सध्या व्हायरल होत असून, तो एका तरुणाने सोशल मीडियावर शेअर केल्याचं सांगितलं जात आहे. या बॅनरमध्ये नेत्यांना उद्देशून एक थेट आणि स्पष्ट विनंती करण्यात आली आहे. “पुण्यात सभा घ्या, प्रचार करा; मात्र धार्मिक मुद्दे, जातीय द्वेष, गद्दारी-बंडखोरी किंवा वैयक्तिक टीका टाळा,” असा संदेश त्यात दिला आहे.

या बॅनरमध्ये शहराच्या दैनंदिन समस्यांवर बोलण्याची मागणी करण्यात आली आहे. वाढती वाहतूक कोंडी, पाण्याचा प्रश्न, शिक्षण व्यवस्था, रोजगाराच्या संधी, कचरा व्यवस्थापन, महिला सुरक्षा आणि पुणे शहराचं दीर्घकालीन व्हिजन हे विषय सभांमध्ये केंद्रस्थानी असावेत, असं त्यात नमूद आहे. सामान्य पुणेकरांच्या दृष्टीने हे मुद्दे अधिक महत्त्वाचे असून, राजकीय आरोप-प्रत्यारोपांपेक्षा त्यावर ठोस चर्चा व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

awa

या पोस्टवर नागरिकांच्या प्रतिक्रिया देखील तितक्याच तीव्र आहेत. काहींनी शहरावर वाढत्या लोकसंख्येचा ताण, मूलभूत सुविधांवर होणारा भार याकडे लक्ष वेधलं आहे. तर काही प्रतिक्रियांमध्ये राजकारणात मुद्द्यांपेक्षा भावनिक घोषणांना प्राधान्य दिलं जात असल्याची टीका करण्यात आली आहे. “जनतेला खरे प्रश्न माहिती आहेत का?” असा थेट सवालही काही जणांनी उपस्थित केला आहे.

या सगळ्या चर्चेत एक भावना वारंवार दिसून येते. पुणे आणि मुंबईसारख्या महानगरांबाबत दीर्घकालीन नियोजन आणि स्थानिक गरजांकडे दुर्लक्ष होत असल्याची. अनेक नागरिकांना असं वाटतं की निवडणुकीच्या काळात केवळ सत्तेसाठी भाषणं दिली जातात, मात्र शहरांच्या विकासासाठी ठोस आराखडे मांडले जात नाहीत. कोणत्याही पक्षाला किंवा नेत्याला शहराच्या भविष्याची खरी काळजी आहे का, हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

एकंदर पाहता, सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा ‘पुणेरी बॅनर’ केवळ एक पोस्ट न राहता पुणेकरांच्या भावना मांडणारा आवाज ठरत आहे. निवडणुकांच्या धामधुमीत हा आवाज नेत्यांपर्यंत पोहोचतो का, आणि प्रचाराच्या भाषणांत खरोखरच शहराच्या मूलभूत प्रश्नांना स्थान मिळतं का, हे येणाऱ्या दिवसांत स्पष्ट होणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number