पुणे : आमदार रोहित पवार यांच्या VSR कंपनीच्या विमान आणि त्यांच्या वाहतूक सर्विसवर अनेकदा प्रश्न उपस्थित करूनसुद्धा पार्थ पवार यांनी VSR कंपनीच्या विमानाने प्रवास केल्याची माहिती समोर येत आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा ज्या VSR कंपनीच्या विमानाने अपघात झाला, त्याच विमान कंपनीने पार्थ पवार यांनी आज, २८ एप्रिल रोजी प्रवास केला आहे. मुंबईहून पुण्यासाठी पवार कुटुंबियांच्या होत असलेल्या स्नेहभोजन कार्यक्रमासाठी राज्यसभा खासदार पार्थ पवार यांनी व्हीएसआर कंपनीच्या विमानाने प्रवास केला असून त्यांच्यासोबत आणखी चार सहकारी असल्याचे समजते. रोहित पवार सातत्याने सगळ्याच VIP लोकांना VSR कंपनीच्या विमानाने प्रवास करू नका, असे सांगत असतानासुद्धा दुसरीकडे त्यांचेच चुलत भाऊ व्हीएसआर कंपनीने प्रवास करत असल्याचं पाहून आता सर्वांच्या भुवया उंचावल्या आहे.
विशेष म्हणजे, आजच्याच दिवशी तीन महिन्यांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले होते. 28 जानेवारी 2026 रोजी व्हीएसआर कंपनीच्या विमानाने प्रवास करत असताना अजित पवारांसह आणखी 4 जणांचा अपघाती मृत्यू झाला होता. आज, 28 एप्रिल रोजी पुन्हा एकदा त्यांचे पुत्र पार्थ पवार यांनी आपल्या सहकार्यासोबत मुंबई ते पुणे असा विमान प्रवास केला आहे. अजितदादांच्या निधनानंतर आमदार रोहित पवार यांनी सातत्याने व्हीएसआर विमान कंपनीविरोधात प्रश्न उपस्थित केले आहेत. वेळोवेळी पत्रकार परिषद घेत कंपनीविरोधातील पुरावे सादर केले आहेत. परंतू, असे असतानादेखील आज पार्थ पवार यांनी व्हीएसआर कंपनीच्या विमानातून प्रवास केल्याने, दोघांच्या विचारात मतभेद आहेत का?, अशी शंका उपस्थित होत आहे.