Supriya Sule Parliament Speech: ‘जंतरमंतरवरील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जची SIT चौकशी करा…’; सुप्रिया सुळेंची संसदेत मागणी

लोकसभेत मांडण्यात आलेल्या 'अँटी पेपर लीक' विधेयकावरील चर्चेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली.

Supriya Sule Parliament Speech: ‘जंतरमंतरवरील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जची SIT चौकशी करा…’; सुप्रिया सुळेंची संसदेत मागणी

Supriya Sule Parliament Speech: नवी दिल्ली येथे जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पाकिस्तान आणि चीनशी संबंध जोडल्याच्या आरोपांवरून संसदेच्या पटलावर जोरदार वादळ उठले आहे. लोकसभेत मांडण्यात आलेल्या ‘अँटी पेपर लीक’ विधेयकावरील चर्चेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली. ‘विद्यार्थ्यांच्या समोशात चीनचा पैसा आणि चहामध्ये पाकिस्तानचा हात असल्याच्या निरर्थक कथा रचणे आता थांबवा,’ अशा कडक शब्दांत त्यांनी सत्ताधारी बाकांवर निशाणा साधला.

विद्यार्थ्यांचे आंदोलन आणि आईची वेदना

जंतरमंतरवर न्याय मागणाऱ्या तरुणाईवर झालेल्या कारवाईचा उल्लेख करत सुप्रिया सुळे भावूक अन् आक्रमक झालेल्या दिसल्या. ‘एका आईच्या नात्याने विचार करते तेव्हा आंदोलनात सहभागी झालेल्या मुलांच्या पालकांच्या वेदना समजतात. राजकीय मतभेद आणि लढाया आपण संसदेबाहेरही लढू शकतो, परंतु ही लढाई आपल्या देशातील विद्यार्थ्यांच्या भवितव्याची आहे,’ असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच, सत्ताधारी पक्षाच्या सहकाऱ्यांनी केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची केलेली मागणी आठवून देत, सरकारने किमान ज्येष्ठ नेत्यांच्या अनुभवाचा आदर करायला हवा होता असा टोलाही लगावला.

हेही वाचा – Akhilesh Yadav: ‘सरकारने मागासवर्गीय समाजाचा शिक्षणाचा अधिकार हिरावून घेतला’; संसदेत अखिलेश यादव यांचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप

शिक्षणव्यवस्था आणि पायाभूत सुविधांवर प्रत्युत्तर

विरोधी बाकांवरून झालेल्या टीकेला उत्तर देताना सुप्रिया सुळे यांनी आपल्या शिक्षण काळातील आठवणींना उजाळा देत सरकारला आरसा दाखवला. ‘आम्ही ज्या काळात शिक्षण घेतले तेव्हा देशात वीज, योग्य रस्ते आणि वेळेवर धावणाऱ्या रेल्वे गाड्या होत्या. आम्हाला शिकण्यासाठी बुलेट ट्रेनची गरज भासली नाही. तुम्ही नक्कीच रस्त्यांचे रुंदीकरण केले असेल, परंतु त्यात हजारो गरीब शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत, हे विसरून चालणार नाही,’ असे प्रत्युत्तर त्यांनी दिले.

लाठीचार्ज प्रकरणाच्या SIT चौकशीची मागणी

आंदोलक तरुणीने पोलीस व्हॅनसमोर दाखवलेल्या धैर्याचे कौतुक करत, आपण ज्या स्वाभिमानाचे शिक्षण मुलींना देतो त्याचेच हे जिवंत उदाहरण असल्याचे त्यांनी नमूद केले. जंतरमंतरवर विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्ज प्रकरणाची तातडीने विशेष तपास पथकाद्वारे (SIT) चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला देशविरोधी ठरवण्याची प्रवृत्ती थांबवून त्यांच्या प्रश्नांकडे गंभीरतेने पाहण्याचे आवाहनही त्यांनी शेवटी केले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number