UPSC AI Face Authentication: केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) आपल्या परीक्षा प्रणालीत आतापर्यंतचा सर्वात मोठा तांत्रिक बदल करण्याच्या तयारीत आहे. आगामी 2026 पासून सर्व यूपीएससी परीक्षांपूर्वी उमेदवारांची 'AI फेस टेस्ट' (कृत्रिम बुद्धिमत्ता चेहरा ओळख चाचणी) घेतली जाणार आहे. या चाचणीत जे उमेदवार उत्तीर्ण होतील, त्यांनाच प्रत्यक्ष परीक्षेला बसण्याची परवानगी दिली जाईल. आयोगाने 10 जानेवारी रोजी अधिकृत सूचना जारी करून या ऐतिहासिक बदलाची घोषणा केली आहे.
फसवणुकीला बसणार 100 टक्के लगाम
यूपीएससीच्या या निर्णयामुळे नागरी सेवा परीक्षा (IAS-IPS), NDA आणि CDS यांसारख्या प्रतिष्ठित परीक्षांमध्ये होणाऱ्या फसवणुकीला पूर्णपणे आळा बसणार आहे. सध्या परीक्षा केंद्रावर प्रवेशपत्र आणि ओळखपत्र पाहून प्रवेश दिला जातो, मात्र 2026 पासून केंद्राच्या प्रवेशद्वारावरच विशेष 'AI' कॅमेरे बसवले जातील. हे कॅमेरे उमेदवाराचा लाईव्ह फोटो घेऊन काही सेकंदात अर्जातील फोटोशी त्याची पडताळणी करतील. यामुळे 'डमी' उमेदवार किंवा कोणत्याही प्रकारची बनावटगिरी करणाऱ्यांना पकडणे सोपे होणार असून, परीक्षेची पारदर्शकता आणि विश्वासार्हता वाढणार आहे.
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना
या नवीन प्रणालीमुळे परीक्षा केंद्रात प्रवेश करण्याची प्रक्रिया पूर्णपणे बदलणार आहे. उमेदवारांनी आता अर्ज भरताना अत्यंत स्पष्ट आणि अलीकडचा फोटो अपलोड करणे अनिवार्य असेल. जुने किंवा अस्पष्ट फोटो असल्यास एआय ऑथेंटिकेशनमध्ये अडथळे येऊ शकतात. तसेच, तांत्रिक प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्यासाठी उमेदवारांना परीक्षेच्या किमान एक तास आधी केंद्रावर पोहोचावे लागणार आहे.
दरम्यान, हा बदल सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी एक क्रांतिकारी पाऊल मानले जात आहे. मॅन्युअल पडताळणीपेक्षा ही पद्धत अधिक वेगवान आणि अचूक असल्याचा दावा आयोगाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. उमेदवारांनी अधिकृत माहितीसाठी केवळ यूपीएससीच्या वेबसाईटवरच विश्वास ठेवावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.