गोव्याच्या उत्तर भागातील अरपोरा येथे शनिवार उशिरा रात्री एका नाइटक्लबमध्ये भीषण आग लागून मोठी दुर्घटना घडली. या आगीत किमान 23 जणांचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती देण्यात आली आहे. पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, गॅस सिलेंडर फुटल्यामुळे ही आग भडकली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले की मृतांमध्ये बहुसंख्यजण क्लबमधील किचन वर्कर्स असून त्यात तीन महिलाही होत्या. मृतांमध्ये तीन ते चार टुरिस्ट असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
पणजीपासून सुमारे 25 किमी अंतरावर असलेल्या बिर्च बाय रोमिओ लेन परिसरातील या लोकप्रिय नाइटक्लबमध्ये मध्यरात्रीनंतर आग लागली. मागील वर्षी सुरू झालेल्या या पार्टी वेन्यूमध्ये अग्निसुरक्षेचे नियम पालन केले नसल्याची शक्यता मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. त्यांनी म्हटले, “सुरक्षा नियमांचे उल्लंघन करूनही परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांवर आणि क्लब मॅनेजमेंटवर कठोर कारवाई केली जाईल.” घटनास्थळी भेट दिल्यानंतर सावंत यांनी सांगितले की तीन जणांचा मृत्यू जळून, तर उर्वरित जणांचा जीव गुदमरल्यामुळे झाला. त्यांनी ही घटना पर्यटन हंगामाच्या काळात घडल्याने ती अत्यंत दुर्दैवी असल्याचे नमूद केले. तसेच संपूर्ण घटनेची सखोल चौकशी करून दोषींना कठोर शिक्षेसाठी कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
गोवा पोलिस प्रमुख आलोक कुमार यांनीही आग सिलेंडर ब्लास्टमुळे झाल्याची खात्री दिली. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करत या दुर्घटनेवर शोक व्यक्त केला. त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना संवेदना व्यक्त करत जखमींच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली. पंतप्रधानांनी मृतांच्या नातेवाईकांना दोन लाख आणि जखमींना 50 हजार रुपयांच्या आर्थिक मदतीची घोषणा केली आहे.
The fire mishap in Arpora, Goa is deeply saddening. My thoughts are with all those who have lost their loved ones. May the injured recover at the earliest. Spoke to Goa CM Dr. Pramod Sawant Ji about the situation. The State Government is providing all possible assistance to those… — Narendra Modi (@narendramodi) December 7, 2025
राष्ट्रपतींनीही दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या नागरिकांविषयी दुःख व्यक्त केले आणि कुटुंबीयांना धीर देण्याचे आवाहन केले. या कठीण काळातून सर्वांनी खंबीरपणे बाहेर पडावे, अशी प्रार्थना त्यांनी केली. स्थानिक भाजप आमदार मायकेल लोबो यांनी सांगितले की सर्व 23 मृतदेह घटनास्थळावरून बाहेर काढून बंबोलिम येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आले आहेत.
Deeply pained by the tragic fire incident in North Goa district resulting in the loss of precious lives. My heartfelt condolences to the bereaved families. May they find strength during this difficult time. I pray for the speedy recovery of those injured. — President of India (@rashtrapatibhvn) December 7, 2025
अग्निशमन दल आणि पोलिसांनी संपूर्ण रात्र बचावकार्य केले. लोबो यांनी सांगितले की अशा घटना पुन्हा घडू नयेत म्हणून सर्व क्लबचे फायर सेफ्टी ऑडिट केले जाणार आहे. कैलंगुट पंचायत सोमवारी सर्व नाइटक्लबना नोटीस देऊन त्यांच्याकडून फायर सेफ्टी परमिशनची मागणी करणार आहे. ज्यांच्याकडे आवश्यक परवानग्या नसतील, त्यांचे लायसन्स रद्द करण्याची कार्यवाही केली जाईल, असेही लोबो यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा: Indigo Flight: इंडिगोची अडचण वाढली; DGCA ची कारणे सांगा नोटीस देत दिली 24 तासांची डेडलाइन