भाजप नेते किरीट सोमय्यांवर राजकीय सुडापोटी कारवाई केली जात नसल्याचं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले आहे. सोमय्यांनी यापूर्वी अनेकांच्या भ्रष्टाचारावर हल्ले केले आहेत. तर लोकांना कायद्यापासून पळू नका असे सल्ले सोमय्यांनी दिले आहेत, मात्र आता ते स्वत:च या प्रकरणातून पळ काढत आहेत, असा घणाघातही राऊतांनी केला आहे.
संजय राऊत म्हणाले, ‘विक्रांत युद्धनौकाप्रकरण न्यायप्रविष्ट असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. मात्र, सोमय्यांवर राजकीय सुडापोटी कारवाई होत नाही. या प्रकरणाचा माझा काहीही संबंध नाही. भोसले नावाचे निवृत्त लष्करी अधिकारी या प्रकरणाचे तक्रारदार असून त्यांनीच तक्रार दाखल केली आहे. तसेच आता कोणी किती पैसे गोळा केले, पैसे गोळा करून काय विनियोग केला, हा पोलीस तपासाचा भाग आहे.’ असे राऊत म्हणाले.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप नेता किरीट सोमय्या यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. विक्रांत युद्धनौकेच्या नावावर ५८ कोटी रुपयांची रक्कम लाटली असल्याचा आरोप संजय राऊतांनी केला आहे.
दरम्यान, भाजप नेते किरीट सोमय्यांवर राजकीय सुडापोटी कारवाई केली जात नसल्याची टीका संजय राऊत यांनी केली आहे. तसेच, राऊतांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना संजय राऊतांकडे त्यांच्या आरोपांचे पुरावे नाही, असे सोमय्या म्हणाले आहेत.
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी २०१४ साली विक्रांत युद्धनौका वाचवण्यासाठी पैसे गोळा करण्याची मोहीम सुरू केली होती. या मोहिमेत ५७ ते ५८ कोटी रुपयांची रक्कम जमा झाली होती. पण ही रक्कम राज्यपाल कार्यालयात पोहचली नसल्याचे समोर आले आहे. सोमय्यांनी विक्रांत युद्धनौकेच्या नावावर लाटलेली रक्कम २०१४च्या निवडणूकीसाठी आणि त्यांच्या निकॉन इन्फ्रा कंपनीत वळवला आहे. हा घोटाळा म्हणजे किरीट सोमय्यांनी देशाच्या संरक्षण व्यवस्थेशी, राष्ट्रीय भावनेशी केलेली प्रतरणा आहे, असे आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांचे आहेत.