उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीबाबत कोणीही बोलू नका, राज ठाकरेंच्या मनसैनिकांना सूचना

राज ठाकरे सध्या परदेशात असून त्यांनी आपल्या पक्षातील वरिष्ठ नेत्यांमार्फत कार्यकर्त्यांना स्पष्टपणे सांगितले आहे. 'उद्धव ठाकरेंच्या युतीबाबत कुणीही बोलू नका'

उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीबाबत कोणीही बोलू नका, राज ठाकरेंच्या मनसैनिकांना सूचना

मुंबई: राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत असलेल्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या संभाव्य युतीवर आता मनसे प्रमुख राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना ‘मौनाचा मंत्र’ दिला आहे. महाराष्ट्रातील राजकारणात खळबळ उडवत असलेल्या या संभाव्य एकत्रित वाटचालीबाबत कोणतीही अधिकृत घोषणा न होतानाही, विविध प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. काही मनसे नेत्यांनीही याबाबत नाराजी व्यक्त केली होती, त्यामुळेच राज ठाकरेंनी या विषयावर भाष्य न करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत.

राज ठाकरे सध्या परदेशात असून त्यांनी आपल्या पक्षातील वरिष्ठ नेत्यांमार्फत कार्यकर्त्यांना स्पष्टपणे सांगितले आहे  'ठाकरे बंधूंच्या युतीबाबत कोणीही बोलू नये.' हा विषय अत्यंत संवेदनशील असून, चुकीच्या पद्धतीने केलेली कोणतीही टिप्पणी पक्षासाठी अडचणीची ठरू शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे सध्या केवळ संयम पाळण्याचा आणि अधिकृत निर्णयाची वाट पाहण्याचा सल्ला दिला जात आहे.

मनसेमध्ये या युतीबाबत संमिश्र प्रतिक्रिया उमटत असताना, राज ठाकरेंचा हा आदेश महत्त्वाचा ठरत आहे. ठाकरे-ठाकरे युतीची शक्यता लक्षात घेता राज्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हं दिसत आहेत. मात्र सध्या पक्षशिस्त महत्त्वाची असल्याचेच राज ठाकरेंनी स्पष्ट केले आहे.

या संपूर्ण घडामोडींना सुरुवात झाली ती जेव्हा राज ठाकरे यांनी एका मुलाखतीदरम्यान उद्धव ठाकरेंना ‘महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र यावं’ अशी खुलेआम साद घातली. त्यावर उद्धव ठाकरेंनीही सकारात्मक प्रतिसाद देत, ‘भूतकाळ विसरून महाराष्ट्रासाठी एकत्र येण्यास तयार आहे’ असं म्हटलं. यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना जोर आला. मात्र सध्याच्या स्थितीला राज ठाकरेंच्या आताच्या सूचनेनंतर कोणतीही अधिकृत घोषणा होईल असं चित्र कुठेही दिसत नाही त्यामुळे राज ठाकरे पुढे काय निर्णय घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number