महाराष्ट्रात मुंबई महानगरपालिका निवडणुकांचे वारे वाहत असताना, बुधवारी 31 डिसेंबर 2025 रोजी घेण्यात आलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मोठ्या प्रकल्पांची घोषणा केली आहे. महाराष्ट्रातील सहा पदरी ग्रीनफिल्ड ॲक्सेस-कंट्रोल्ड नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडॉरच्या बांधकामाला मंजुरी देत हिरवा कंदील दाखविण्यात आला आहे.
हेही वाचा- BMC Election 2026 : मोठी बातमी! ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात निलेश राणे तळ ठोकणार
महाराष्ट्रासाठी मोठी घोषणा:
नाशिक–सोलापूर 6-लेन महामार्ग प्रकल्पाला केंद्राची मंजुरी
19,142 कोटींचा हाप्रकल्प दोन वर्षांत पूर्ण होणार
केंद्रीय मंत्रिमंडळाने आज देशातील दोन मोठ्या महामार्ग प्रकल्पांना मंजुरी दिली असून त्यामधील सर्वात मोठा प्रकल्प म्हणजे महाराष्ट्रातील 6-लेन ग्रीनफील्ड नाशिक–सोलापूर महामार्ग कॉरिडॉर.
या 374 किलोमीटर लांबीच्या महामार्गासाठी 19,142 कोटी रुपयांचा खर्च मंजूर करण्यात आला आहे.
हा प्रकल्प दोन वर्षांत पूर्ण करण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे.
सुरत–चेन्नई हायस्पीड कॉरिडॉरचा महत्त्वाचा भाग
हा महामार्ग सुरत–चेन्नई हायस्पीड कॉरिडॉरचा एक महत्त्वाचा दुवा ठरणार आहे. त्यामुळे पश्चिम भारताचा दक्षिण भारताशी दळणवळणाचा वेगवान व अखंड संपर्क प्रस्थापित होईल.
हा रस्ता खालील जिल्ह्यांतून जाणार आहे:
• नाशिक
• अहिल्यानगर (जालना/छत्रपती संभाजीनगर विभागातील क्षेत्राचा समावेश)
• धाराशिव (उस्मानाबाद)
• सोलापूर
या महामार्गात एकूण 27 मोठे पूल, 164 छोटे पूल असा उभारण्यात येणार आहेत. या प्रकल्पामुळे नाशिक–सोलापूरमधील अंतर 432 किमीवरून 374 किमीपर्यंत कमी होईल, म्हणजेच सुमारे 14% घट असून यामुळे वेळ, इंधन आणि वाहतूक खर्च मोठ्या प्रमाणावर कमी होणार आहे. हा महामार्ग पूर्ण झाल्यानंतर उद्योग आणि व्यापाराला नवीन गती मिळणार असून कृषी व उत्पादन क्षेत्राला वेगवान वाहतूक सुविधा उपलब्ध होणार आहेत. तसेच लॉजिस्टिक्स आणि पुरवठा साखळी मजबूत होईल आणि पर्यटनालाही चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
केंद्रीय पातळीवरून सांगण्यात आले की, हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर नाशिक, मराठवाडा आणि मराठवाडा-विदर्भ जोडणाऱ्या भागांसाठी हा महामार्ग गेमचेंजर ठरेल.
आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत नाशिक–सोलापूर 6-लेन कॉरिडॉर या प्रकल्पाला 19,142 कोटी आणि ओडिशातील NH-326 चौडीकरण प्रकल्पाला 1,526 कोटी अशी एकूण 20,668 कोटींच्या दोन हायवे प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली.