Nagpur Heat Wave Alert: विदर्भात सूर्याचा प्रकोप वाढत असून नागपूर जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा (Heat Wave) गंभीर इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्याची सुरक्षा लक्षात घेऊन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी शनिवार, 18 एप्रिल 2026 रोजी जिल्ह्यातील सर्व शाळा आणि शैक्षणिक संस्थांना तात्काळ सुट्टी जाहीर केली आहे. हवामान विभागाने उद्यासाठी 'यलो अलर्ट' जारी केल्याने प्रशासनाने हे प्रतिबंधात्मक पाऊल उचलले आहे.
पारा 43 अंशांच्या पार; 'हीट ॲक्शन प्लॅन' सक्रिय
मार्च महिन्यापासूनच नागपूरचा पारा सातत्याने चढत असून सध्या तो 43 अंश सेल्सिअसच्या पुढे गेला आहे. वाढत्या उन्हाचा धोका टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने संपूर्ण जिल्ह्यात 'हीट ॲक्शन प्लॅन' लागू केला आहे.
प्रशासनाची तयारी:
शीतकक्ष (Cooling Centers): जिल्ह्यात एकूण 56 विशेष शीतकक्ष उभारण्यात आले आहेत. यामध्ये 2 उपजिल्हा रुग्णालये आणि 11 प्राथमिक आरोग्य केंद्रांचा समावेश आहे.
विशेष सोयी: या कक्षांमध्ये एसी, हाय-स्पीड कुलर्स, बर्फाचा साठा आणि उष्माघाताच्या रुग्णांसाठी 'कोल्ड बाथ'ची व्यवस्था करण्यात आली आहे.
आरोग्य सेवा: प्राथमिक आरोग्य केंद्रांवर शीघ्र कृती दल (Rapid Response Team) तैनात करण्यात आले असून आवश्यक औषधसाठा उपलब्ध करून दिला आहे.
शाळा आणि ग्रामीण भागासाठी विशेष नियमावली
सुट्टी संपल्यानंतरही शाळांनी खबरदारी म्हणून सकाळच्या सत्रात वर्ग भरवणे, विद्यार्थ्यांना दिवसातून दोनदा 'वॉटर बेल' देऊन पाणी पिण्यास प्रोत्साहित करणे आणि डिहायड्रेशन टाळण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ग्रामीण भागात ग्रामपंचायतींमार्फत दवंडी पिटवून नागरिकांना दुपारी 12 ते 4 या वेळेत घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच शेतकऱ्यांनी शेतीची कामे सकाळी लवकर किंवा सायंकाळी उशिरा उरकावीत, असा सल्ला देण्यात आला आहे.
हेही वाचा – Jalgaon Heat: जळगावात तापमानाचा पारा वाढला, वीजपुरवठा खंडित होऊ नये यासाठी महावितरणाचा अनोखा उपाय
नागपूरकरांसाठी प्रशासनाचे आवाहन:
1. घराबाहेर पडताना हलके आणि सुती कपडे वापरा.
2. दिवसभरात भरपूर पाणी प्या आणि ओले कापड जवळ ठेवा.
3. लहान मुले, वृद्ध आणि आजारी व्यक्तींची विशेष काळजी घ्या.
4. बस स्थानक आणि बाजारपेठांसारख्या सार्वजनिक ठिकाणी पाणपोईची सोय करण्याचे निर्देश दिले आहेत.