Prataprao Jadhav: महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सध्या ‘ऑपरेशन टायगर’वरून (Operation Tiger) जोरदार चर्चा रंगली आहे. शिवसेना (शिंदे गट) नेते तथा केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी या संदर्भात एक अत्यंत मोठा आणि खळबळजनक दावा केला आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, राज्यात लवकरच ‘ऑपरेशन टायगर’ पूर्ण होणार असून, 14 पेक्षा जास्त आमदार हे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करतील.
दिल्लीतील निर्णयांवर वरिष्ठ नेतृत्वाचे वर्चस्व
केंद्रातील धोरणात्मक निर्णय आणि पदवाटपाविषयी बोलताना प्रतापराव जाधव यांनी स्पष्ट केले की, दिल्लीत कुणाला काय पद द्यायचे किंवा काय जबाबदारी सोपवायची, याचा निर्णय स्थानिक पातळीवर घेतला जात नाही. देशाचा मोठा घटक पक्ष असलेल्या भाजपचे प्रमुख नेते, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे देशहिताचा विचार करून हे निर्णय घेतात. कोणता व्यक्ती कुठल्या पदाला योग्य न्याय देऊ शकतो, याचा सूक्ष्म विचार करूनच ते वाटप केले जाते. या निर्णयांतूनच देश आणि महाराष्ट्राच्या विकासाची लोकांची अपेक्षा पूर्ण केली जात असल्याचे त्यांनी नमूद केले.
‘एकनाथ शिंदे हेच लोकांच्या मनातले मुख्यमंत्री
एकनाथ शिंदे यांच्या कार्यशैलीचे कौतुक करताना प्रतापराव जाधव म्हणाले की, “एकनाथ शिंदे हे खऱ्या अर्थाने लोकांच्या मनातले मुख्यमंत्री आहेत. गेल्या काळात त्यांनी घेतलेले लोकाभिमुख निर्णय, वैवैधिक लाभाच्या जनकल्याणकारी योजना आणि संपूर्ण महाराष्ट्रात झंझावाती दौरे करून जनतेशी साधलेला थेट संपर्क यामुळे ते लोकप्रिय ठरले आहेत.” दिवसातील 18 ते 20 तास काम करणारा आणि नैसर्गिक आपत्तीच्या काळात किंवा संकटात असणाऱ्या लोकांच्या मदतीला सर्वात आधी धावून जाणारा नेता म्हणून जनता शिंदेंकडे पाहते, असेही ते म्हणाले.
‘हर घर तिरंगा’ मोहिमेचा उत्साह आणि स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा
स्वातंत्र्यदिनाच्या औचित्यावर बोलताना जाधव यांनी देशवासीयांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार ‘हर घर तिरंगा’ मोहीम संपूर्ण देशभरात उत्साहात पार पडली असून, ठिकठिकाणी भव्य तिरंगा रॅली काढण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येकाने आपल्या घरावर राष्ट्रध्वज फडकवून या स्वातंत्र्याचा आणि राष्ट्रध्वजाचा सार्थ अभिमान बाळगावा, असे आवाहन करत त्यांनी बुलढाणा जिल्ह्यातील सर्व नागरिकांना 15ऑगस्ट आणि स्वातंत्र्यदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.