नांदेड जिल्ह्यातील दुष्काळ आणि शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर ठाकरे गटाकडून मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. याचपार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत हे सध्या नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून, तेथील गंभीर दुष्काळी परिस्थिती आणि शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांवर शिवसेना (उबाठा) पक्षाच्या वतीने आयोजित विशाल मोर्च्याचे नेतृत्व करण्यासाठी आले होते. यावेळी राज्यातील परिस्थितीवर भाष्य करतानाच त्यांनी केंद्रातील सत्तेवर जोरदार निशाणा साधला.
एमपीएससी (MPSC) पेपरफुटी प्रकरणी राज्य सरकारने जाहीर केलेल्या ‘विशेष तपास पथका’च्या (SIT) चौकशीवर संजय राऊत यांनी अत्यंत बोधप्रद शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यपद्धतीवर टीका केली. तर दुसरीकडे संजय राऊत यांनी मोदी सरकारविषयी मोठं भाकीत केलं आहे. मी देशातील खरी परिस्थिती मांडत आहे, हे सरकार 2029 पर्यंत टिकणारच नाही, असा दावा त्यांनी यावेळी व्यक्त केला.
संजय राऊत म्हणाले की, "2029च्या आधी सरकार राहत नाही. सरकार जात आहे. हे केवळ माझे भाकीत नसून देशातील वस्तुस्थिती आहे. 2029च्या आधीच नरेंद्र मोदी पंतप्रधानपदावर राहणार नाहीत आणि अमित शाहही सत्तेत दिसणार नाहीत. येत्या काळात राज्यात आणि देशात अफाट राजकीय पडझड व मोठी उलथापालथ पाहायला मिळेल. मोदी सरकार आपला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्णच करू शकत नाही. राज्यात आणि देशात मोठे फेरबदल होतील. अनेक ठिकाणी पडझड होईल. मोदी त्यांचा कार्यकाळ पूर्ण करणार नाहीत. मी भाकीत करत नाही. सत्य स्थिती सांगतोय."
एमपीएससी पेपरफुटीवरून फडणवीसांवर टीका
“मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कार्यकाळात आतापर्यंत तब्बल 57 एसआयटी स्थापन झाल्या असून, ही 58 वी एसआयटी असेल. परंतु आजवर या स्थापन केलेल्या एसआयट्यांमधून काय निष्पन्न झाले? राज्यात कोणतीही गंभीर घटना घडली की केवळ वेळ मारून नेण्यासाठी एसआयटी स्थापन केली जाते. महाराष्ट्राच्या प्रशासनाला आणि जनतेला आता या एसआयट्यांचे अजीर्ण झाले आहे. एमपीएससीच्या सावळ्यागोधळामुळे हजारो तरुण रस्त्यावर आले असून त्यांचे भवितव्य अंधारात सापडले आहे, अशा वेळी केवळ एसआयटीची घोषणा करून सरकार काय साध्य करणार?”