मुंबई : बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय कोट्यातील सदनिका लाटल्याप्रकरणी न्यायालयाने दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या जामीनावर अखेर न्यायालयाचा निकाल समोर आला आहे. मुंबई हायकोर्टाने त्यांना एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजून केला असून कोकाटेंना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या काही दिवसांपासून कोकाटेंवर अटकेची टांगती तलवार लटकत होती. मात्र कोर्टाच्या निकालामुळे कोकाटेंना आता जामीन मंजूर झाला आहे. मात्र कोकाटेंची अटक ही तात्पुरती टळली असली तरी त्यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आली नसल्याचेही कोर्टाने यावेळी स्पष्ट केले आहे. त्यामुळे कोकाटेंची 2 वर्षांची शिक्षा आणि 50 हजार रुपयांचा दंड ही शिक्षा अजूनही कायम आहे.