TMC Split: तृणमूल काँग्रेसमध्ये उभी फूट; ममता बॅनर्जी दिल्लीत असतानाच 20 लोकसभा खासदारांचे बंड, NDA ला पाठिंबा देण्याची घोषणा

टीएमसीच्या 20 लोकसभा खासदारांनी बंडाचे निशाण फडकवत थेट लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहिले आहे. हे बंडखोर खासदार संसदेत आपला एक स्वतंत्र गट स्थापन करण्याच्या तयारीत आहेत.

TMC Split: तृणमूल काँग्रेसमध्ये उभी फूट; ममता बॅनर्जी दिल्लीत असतानाच 20 लोकसभा खासदारांचे बंड, NDA ला पाठिंबा देण्याची घोषणा

TMC Split: पश्चिम बंगालमधील विधानसभा आमदारांनंतर आता तृणमूल काँग्रेस (TMC) पक्षाला लोकसभेतही सर्वात मोठा धक्का बसला आहे. पक्षाच्या अंतर्गत सूत्रांनी दिलेल्या खळबळजनक माहितीनुसार, टीएमसीच्या 20 लोकसभा खासदारांनी बंडाचे निशाण फडकवत थेट लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहिले आहे. हे बंडखोर खासदार संसदेत आपला एक स्वतंत्र गट स्थापन करण्याच्या तयारीत असून, भविष्यात एका नव्या राजकीय पक्षाची घोषणा देखील करू शकतात. विशेष म्हणजे, टीएमसी प्रमुख ममता बॅनर्जी या विरोधी पक्षांच्या 'INDIA' आघाडीच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी दिल्लीत दाखल झाल्या आहेत. दिल्लीत येऊन आपल्या खासदारांची मनधरणी करण्याच्या त्यांच्या योजनेपूर्वीच, या 20 खासदारांनी बंड पुकारून त्यांच्या अडचणी वाढवल्या आहेत.

खासदार काकोली घोष दस्तीदार यांचे नेतृत्व; भाजपच्या 'एनडीए'ला पाठिंबा
या संपूर्ण बंडाचे चित्र स्पष्ट करताना तृणमूलच्या ज्येष्ठ नेत्या आणि खासदार काकोली घोष दस्तीदार यांनी एक मोठी घोषणा केली आहे. त्यांनी सांगितले की, स्वतःसह पक्षाच्या सुमारे 20 खासदारांनी केंद्र सरकार चालवणाऱ्या भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (NDA) पाठिंबा देण्याचा अंतिम निर्णय घेतला आहे. या सर्व खासदारांनी एनडीए सोबत जाण्याची इच्छा व्यक्त करणारे अधिकृत पत्र लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे सुपूर्द केले आहे. "आम्ही बंगालमधील विधानसभा निवडणुकीचे निकाल खुल्या मनाने स्वीकारले असून, राज्याच्या विकासासाठी आमचा पुढील राजकीय प्रवास एनडीए सोबतच असणे गरजेचे आहे," अशी स्पष्टोक्ती दस्तीदार यांनी दिली आहे.

दिल्लीत बंडखोरांची गुप्त बैठक आणि पुढील रणनीती
पश्चिम बंगालच्या निवडणुकीनंतर तृणमूल काँग्रेसमध्ये सुरू झालेली राजकीय अस्थिरता आता देशाची राजधानी दिल्लीत पोहोचली आहे. एकीकडे ममता बॅनर्जी बैठकांमध्ये व्यस्त असताना, दुसरीकडे नाराज खासदारांनी दिल्लीत एक गुप्त आणि अनौपचारिक बैठक घेतली. या बैठकीला 20 पेक्षा जास्त खासदारांची उपस्थिती होती. रविवारी झालेल्या या महत्त्वपूर्ण खलबतांनंतर, सोमवारी देखील हे सर्व खासदार एकमेकांच्या संपर्कात होते आणि त्यांनी दिल्लीतील केंद्र सरकारच्या एका कार्यालयात आपल्या पुढील रणनीतीवर विस्तृत चर्चा केली. आवश्यक तेवढे संख्याबळ पाठीशी असल्याने या गटाला कायदेशीर अडचण येणार नसल्याचे सांगितले जात आहे.

हेही वाचा – INDIA Alliance Meeting: 'इंडिया' आघाडीच्या बैठकीबाबत उबाठा गटाच्या नेत्याचं महत्त्वाचं विधान; म्हणाले, 'राहुल गांधींनी पंतप्रधान व्हावे…'

विधानसभेतील बंडखोरीनंतर लोकसभेतही पक्षाला खिंडार
टीएमसी मधील हे खासदारांचे बंड म्हणजे काही दिवसांपूर्वी बंगाल विधानसभेत झालेल्या अभूतपूर्व बंडाळीचीच पुढील आवृत्ती मानली जात आहे. विधानसभेत पक्षाच्या नेतृत्वाला आणि ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का देत तब्बल 58 आमदारांनी बंड केले होते. या आमदारांनी ममता बॅनर्जी यांनी सुचवलेले अधिकृत उमेदवार सोवनदेब चट्टोपाध्याय यांचे नाव साफ नाकारले होते आणि विरोधी पक्षनेतेपदासाठी रिताब्रत बॅनर्जी यांच्या नावाला आपला जाहीर पाठिंबा दिला होता. आमदारांपाठोपाठ आता लोकसभेतील 20 खासदारांनीही बंड केल्यामुळे तृणमूल काँग्रेसमधील अंतर्गत वाद आता विकोपाला गेल्याचे स्पष्ट झाले आहे. 
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number