Sachin Padwal: ठाकरे गटाकडून मोठी संघटनात्मक खांदेपालट; पुणे संपर्कप्रमुखपदी सचिन पडवळ यांची निवड

पक्ष संघटनेची पकड अधिक मजबूत करण्याच्या रणनीतीचा भाग म्हणून पुणे जिल्ह्याच्या संपर्कप्रमुखपदी सचिन पडवळ यांची अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे.

Sachin Padwal: ठाकरे गटाकडून मोठी संघटनात्मक खांदेपालट; पुणे संपर्कप्रमुखपदी सचिन पडवळ यांची निवड

Sachin Padwal: आगामी 2029 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षांतर्गत रचनेत मोठे संघटनात्मक फेरबदल करण्यास सुरुवात केली आहे. पक्ष संघटनेची पकड अधिक मजबूत करण्याच्या रणनीतीचा भाग म्हणून पुणे जिल्ह्याच्या संपर्कप्रमुखपदी सचिन पडवळ यांची अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे. या नव्या जबाबदारीनुसार सचिन पडवळ यांच्यावर बारामती मतदारसंघासह पुणे जिल्ह्यातील तब्बल 21 विधानसभा मतदारसंघांचे समन्वय साधणे, स्थानिक पातळीवर नेटवर्क उभारणे आणि पक्षसंघटन बळकट करण्याचे महत्त्वाचे आव्हान असणार आहे.

सचिन अहिर यांच्या पक्षांतरानंतर ठाकरेंचा निर्णय; निष्ठावंतावर मोठी जबाबदारी
यापूर्वी पुणे जिल्ह्याची ही महत्त्वाची जबाबदारी माजी आमदार सचिन अहिर यांच्याकडे होती. मात्र, सचिन अहिर यांनी ठाकरे गटाला रामराम ठोकून शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षात प्रवेश केला. वरळीचे प्रतिनिधित्व केलेले आणि पक्षाने विधान परिषदेवर पाठवलेले अहिर शिंदे गटात गेल्याने ठाकरे गटाला राजकीय धक्का बसला होता. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी कोणत्याही विलंबाशिवाय पक्षाशी ठाम राहिलेल्या आणि अत्यंत निष्ठावंत मानल्या जाणाऱ्या सचिन पडवळ यांच्यावर विश्वास दाखवत ही मोठी धुरा सोपवली आहे.

हेही वाचा – Ahilyanagar Crime: अहिल्यानगरात राजकीय वादाला हिंसक वळण! भाजप पदाधिकाऱ्यावर तब्बल 100 जणांचा हल्ला; परिसरात तणावाचं वातावरण

कोण आहेत सचिन पडवळ? मुंबईतील कामाचा तगडा अनुभव
सचिन पडवळ हे मुंबईतील ठाकरे गटाचे अत्यंत अभ्यासू, आक्रमक आणि निष्ठावंत नगरसेवक म्हणून ओळखले जातात. मुंबई महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक 206 (शिवडी, लालबाग आणि काळाचौकी परिसर) मधून त्यांनी सत्ताधारी म्हणून काम पाहिले आहे. 2017 च्या पालिका निवडणुकीत त्यांनी विजय मिळवला होता, तर पक्षातील फुटीनंतरही उद्धव ठाकरेंशी एकनिष्ठ राहत त्यांनी 2026 च्या पालिका निवडणुकीतही दणदणीत विजय मिळवला. मुंबई पालिकेच्या सुधार समितीचे सदस्य म्हणून नागरी प्रश्न, पाणी, आरोग्य सुविधा आणि पायाभूत विकासाच्या मुद्द्यांवर त्यांनी प्रभावी कामगिरी बजावली आहे.

पश्चिम महाराष्ट्रात पक्ष पुनर्बांधणीचे नवे आव्हान
पुणे आणि पश्चिम महाराष्ट्र हा राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाचा पट्टा मानला जातो. अहिर यांच्या एक्झिटनंतर पडवळ यांच्या रूपाने एका कष्टाळू आणि ग्रासरूट लेव्हलच्या नेत्याला मैदानात उतरवून ठाकरेंनी स्पष्ट राजकीय संकेत दिले आहेत. आगामी काळात 21 मतदारसंघांमधील अंतर्गत मतभेद दूर करणे, कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह भरणे आणि ठाकरेंची शिवसेना पुन्हा जोमाने उभी करणे हेच सचिन पडवळ यांचे मुख्य ध्येय असणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number