Eknath Shinde Delhi Visit: राज्यातील राजकीय वातावरणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. शिवसेना पक्षनाव आणि ‘धनुष्यबाण’ या चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुरू होणाऱ्या निर्णायक सुनावणीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ऐनवेळी मंत्रिमंडळ बैठक सोडून दिल्लीला रवाना झाले आहेत. 2 सप्टेंबरपासून सरन्यायाधीशांच्या पीठासमोर शिंदे गटाच्या वकिलांचा युक्तिवाद सुरू होत असल्याने, या कायदेशीर लढाईची पूर्वतयारी करण्यासाठी शिंदे यांचा हा दौरा अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जात आहे. या अचानक ठरलेल्या दौऱ्यामुळे सत्ताधारी गोटात आणि राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले असून, ते दिल्लीत वकिलांसोबतच काही केंद्रीय नेत्यांचीही भेट घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ठाकरे गटाच्या युक्तिवादाला उत्तर देण्याचे आव्हान
सर्वोच्च न्यायालयात यापूर्वी झालेल्या सुनावणीदरम्यान ठाकरे गटाच्या वकिलांनी सलग 9 दिवस आक्रमक युक्तिवाद करत आमदारांची अपात्रता, विधानसभा अध्यक्षांचा निर्णय आणि निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले होते. आता उद्यापासून शिंदे गटाच्या कायदेतज्ज्ञांना ठाकरे गटाचे हे सर्व दावे खोडून काढत आपली कायदेशीर बाजू वैध सिद्ध करावी लागणार आहे. यासाठी मूळ पक्षातील बंडखोरी वेळची परिस्थिती, विधिमंडळ पक्षातील बहुमताची आकडेवारी आणि इतर तांत्रिक दस्तऐवज कोर्टासमोर प्रभावीपणे मांडणे गरजेचे आहे. याच कायदेशीर रणनीतीवर अंतिम हात फिरवण्यासाठी आणि वकिलांना आवश्यक ते पुरावे उपलब्ध करून देण्यासाठी एकनाथ शिंदे स्वतः दिल्लीत उपस्थित राहून चर्चा करणार आहेत.
हेही वाचा – Operation Tiger : उद्धवसेनेचे नगराध्यक्ष सात नगरसेवकांसह आज शिंदेसेनेत प्रवेश करणार?; ‘ऑपरेशन टायगर’ सक्रीय
कॅबिनेटला दांडी अन् राजकीय हालचालींना वेग; दिल्लीत मुक्काम ठरणार निर्णायक
दुसरीकडे, मुंबईत आयोजित राज्य मंत्रिमंडळाच्या महत्त्वाच्या बैठकीला एकनाथ शिंदे अनुपस्थित राहिल्याने राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले आहे. या बैठकीत मराठा-ओबीसी आंदोलन, गणेशोत्सवाची तयारी आणि पावसाची स्थिती यावर चर्चा अपेक्षित असताना, शिंदेंनी न्यायालयीन लढाईला प्राधान्य देत दिल्ली गाठणे पसंत केले. वकिलांशी प्रदीर्घ चर्चा केल्यानंतर शिंदे आजच मुंबईत परतणार की सुप्रीम कोर्टातील प्रत्यक्ष सुनावणीच्या वेळी दिल्लीतच मुक्काम ठोकणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. या सुनावणीच्या निकालावरच राज्यातील सत्तासंघर्षाचे भवितव्य अवलंबून असल्याने या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.