Human Trafficking : मोठ्या पगाराच्या मोहापायी बेरोजगार तरुण आंतरराष्ट्रीय सायबर माफियांच्या जाळ्यात कसे अडकतात, याचा एक भीषण प्रकार बीडमध्ये उघडकीस आला आहे. फेसबुकवर नोकरीची जाहिरात पाहून बँकॉकला गेलेल्या बीडमधील एका 24 वर्षीय ग्राफिक डिझायनर तरुणाची म्यानमार सीमेवर क्रूर छळछावणीत सुटका न होणाऱ्या चक्रव्यूहात अडवणूक झाली आहे. या गंभीर आंतरराष्ट्रीय मानवी तस्करीची दखल घेत आता भारताच्या केंद्रीय गुप्तचर यंत्रणेने (IB) थेट तपासाची सूत्रे हाती घेतली आहेत. 'आयबी'च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बीडच्या सायबर पोलीस ठाण्यात पोहोचून स्थानिक पोलिसांच्या मदतीने तपासाची चक्रे गतिमान केली आहेत.
छळछावणीत 800 भारतीय तरुण कैद
संबंधित पीडित तरुणाला 70000 रुपयांच्या पगाराचे आमिष दाखवून 4 जून 2026 रोजी बँकॉकला बोलावण्यात आले होते. मात्र, तिथून त्याचे अपहरण करून त्याला थायलंड आणि म्यानमारच्या सीमेवरील एका अज्ञात छळछावणीत डांबण्यात आले. तिथे त्याच्याकडून सक्तीने ऑनलाईन आर्थिक फसवणुकीचे गुन्हे करून घेतले जात आहेत. नकार दिल्यास दररोज 16 ते 18 तास अमानुषपणे राबवून घेतले जाते आणि विजेचे (करंटचे) झटके दिले जातात, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. पीडिताने पाठवलेल्या माहितीनुसार, या धोकादायक ठिकाणी सध्या जवळपास 800 भारतीय तरुण ओलीस असून, त्यामध्ये महाराष्ट्रातील 20 ते 25 तरुणांचा समावेश आहे. अत्यंत भीतीदायक बाब म्हणजे तिथे आधीच 2 ते 3 जणांना जीवाने मारून टाकण्यात आले आहे.
आंतरराष्ट्रीय सायबर रॅकेट उघड
दरम्यान, भारतीय तरुणांना डांबून ठेवून त्यांच्याकडून जगभरात सायबर गुन्हे घडवून आणणारे एक मोठे आंतरराष्ट्रीय रॅकेट यामागे सक्रिय असल्याचे स्पष्ट झाले आहे. देशाच्या अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टीने ही बाब अत्यंत गंभीर असल्याने केंद्रीय गुप्तचर यंत्रणा सतर्क झाली आहे. महाराष्ट्रात आणि देशात बसून या आंतरराष्ट्रीय माफियांसाठी एजंट म्हणून काम करणाऱ्या स्थानिक दलालांचे जाळे शोधून काढण्याचे मोठे आव्हान आता बीड सायबर पोलिसांसमोर उभे राहिले आहे.
आमदार धनंजय मुंडे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
या आंतरराष्ट्रीय प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे यांनी थेट विधानभवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांना एक सविस्तर पत्र सोपवून, केंद्र सरकार आणि परराष्ट्र मंत्रालयाच्या तातडीच्या हस्तक्षेपाची मागणी केली आहे. म्यानमार सीमेवर अडकलेल्या बीडच्या तरुणासह सर्व 800 भारतीयांना सुरक्षित मायदेशी आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करावेत, तसेच मानवी तस्करी करणाऱ्या स्थानिक व आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांवर कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी आग्रही विनंती त्यांनी सरकारला केली आहे.