Lungi Ngidi Injury: दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्स यांच्यात खेळल्या गेलेल्या आयपीएल 2026 मधील 19 व्या सामन्यात एक धक्कादायक आणि दुर्दैवी घटना घडली. दिल्ली कॅपिटल्सचा वेगवान गोलंदाज लुंगी एन्गिडी याला क्षेत्ररक्षण करताना डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. दुखापतीचे स्वरूप इतके गंभीर होते की, एन्गिडीला स्वतःच्या पायावर उभे राहणेही कठीण झाले होते. अखेर परिस्थितीची गंभीरता ओळखून मैदानावरच रुग्णवाहिका बोलावण्यात आली आणि त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
नेमकी कशी झाली दुखापत?
पंजाब किंग्सचा संघ 265 धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करत असताना ही घटना घडली. तिसऱ्या षटकात अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर फलंदाज प्रियांश आर्याने एक मोठा फटका खेळला. ‘मिड-ऑफ’ला उभा असलेला लुंगी एन्गिडी हा झेल घेण्यासाठी मागे धावला. मात्र, धावत असताना त्याचा तोल गेला आणि तो डोक्याच्या बाजूने वेगाने जमिनीवर आदळला. या भीषण अपघातानंतर एन्गिडी जमिनीवरच पडून राहिला आणि प्रचंड वेदनेने विव्हळू लागला. हे दृश्य पाहून मैदानातील खेळाडू आणि प्रेक्षक पूर्णपणे हादरून गेले. एन्गिडीच्या डोक्याला मार लागल्यामुळे वैद्यकीय नियमांनुसार तो या सामन्यातून बाहेर झाला आहे. त्याच्या जागी दिल्ली कॅपिटल्सने श्रीलंकेच्या दुष्मंथा चमीराची ‘कन्कशन सबस्टिट्यूट’ म्हणून संघात निवड केली आहे. एन्गिडीच्या दुखापतीनंतर पंजाबचे प्रशिक्षक रिकी पाँटिंग यांनीही तातडीने मैदानावर येऊन त्याच्या प्रकृतीची विचारपूस केली. सध्या एन्गिडीवर तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू असून, संपूर्ण क्रीडा जगत त्याच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करत आहे.
DC ಪಾಲಿಗೆ ಇದು ದೊಡ್ಡ ಹೊಡೆತ!? Lungi Ngidi ಆದಷ್ಟು ಬೇಗ ಕಮ್ಬ್ಯಾಕ್ ಮಾಡಲಿ ಅನ್ನೋದೇ ನಮ್ಮ ಹಾರೈಕೆ. ? ವೀಕ್ಷಿಸಿ | #TATAIPL2026 ? #DCvsPBKS | LIVE NOW | ನಿಮ್ಮ Star Sports ಕನ್ನಡ & JioHotstar ನಲ್ಲಿ.#TATAIPL pic.twitter.com/0fL7MH2prF — Star Sports Kannada (@StarSportsKan) April 25, 2026
सामन्यातील इतर घडामोडी
या दुर्दैवी घटनेपूर्वी दिल्ली कॅपिटल्सच्या फलंदाजांनी मैदानावर धावांचा पाऊस पाडला होता. केएल राहुलने केवळ 67 चेंडूंत नाबाद 152 धावांची ऐतिहासिक खेळी केली, तर नितीश राणाने 91 धावांचे मोलाचे योगदान दिले. या दोघांच्या फटकेबाजीमुळे दिल्लीने 2 गड्यांच्या मोबदल्यात 264 धावांचा डोंगर उभा केला होता. मात्र, सामन्याच्या उत्तरार्धात एन्गिडीच्या दुखापतीमुळे खेळाच्या उत्साहावर चिंतेचे सावट पसरले आहे.