New Year 2026 : नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मुंबईत होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेता, मुंबई पोलीस आणि वाहतूक यंत्रणांनी कंबर कसली आहे. मुंबईकरांना सुरक्षितपणे घराबाहेर पडता यावे आणि सेलिब्रेशननंतर सुखरूप घरी परतता यावे, यासाठी रेल्वे, मेट्रो आणि बेस्टने आपल्या सेवा रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
मुंबई पोलिसांचे 'सुरक्षा कवच'
निवडणुकीची आचारसंहिता आणि 31 डिसेंबरचा उत्साह पाहता मुंबईत कडक नाकाबंदी करण्यात आली आहे. यावेळी 10 अप्पर पोलीस आयुक्त, 38 उपायुक्त आणि 14,200 हून अधिक पोलीस कर्मचारी रस्त्यावर असतील. तसेच SRPF, दंगल नियंत्रण पथक आणि QRT ची तुकडी तैनात करण्यात आली आहे. याशिवाय, मद्यपान करून गाडी चालवणाऱ्यांची ठिकठिकाणी तपासणी होईल. मदतीसाठी 100 आणि 112 हेल्पलाईन क्रमांक 24 तास कार्यरत राहतील.
हेही वाचा – BMC Election : मुंबईत मतदानापूर्वीच महायुतीला दोन धक्के; 'या' कारणांमुळे उमेदवारांचे अर्ज बाद
मेट्रो-3 'ॲक्वालाईन' रात्रभर धावणार
मुंबईकरांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी म्हणजे मेट्रो-3 (अॅक्वालाईन) ही 31 डिसेंबरच्या रात्री 10:30 पासून ते 1 जानेवारीच्या पहाटे 5:55 पर्यंत विनाखंड सुरू राहील.
मेट्रो-1 (वर्सोवा-घाटकोपर): या मार्गावर 28 अतिरिक्त फेऱ्या चालवल्या जातील. वर्सोवाहून शेवटची गाडी पहाटे 2:14 ला, तर घाटकोपरहून 2:40 ला सुटेल.
मुंबई लोकलचे विशेष वेळापत्रक
मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी विशेष गाड्यांचे नियोजन केले आहे:
मध्य रेल्वे: CSMT ते कल्याण आणि CSMT ते पनवेल या मार्गावर दोन्ही बाजूंनी शेवटची लोकल रात्री 1:30 वाजता सुटेल.
पश्चिम रेल्वे: चर्चगेट ते विरार दरम्यान विशेष गाड्या रात्री 1:15, 2:00, 2:30 आणि पहाटे 3:25 वाजता उपलब्ध असतील.
हेही वाचा – BJP Mumbai Candidate List: मुंबईत भाजपकडून 136 उमेदवारांची यादी जाहीर; नार्वेकरांच्या घरात 3 जणांना तिकीट
बेस्ट (BEST) बससेवा आणि 'हेरिटेज टूर'
अतिरिक्त बसेस: गेटवे ऑफ इंडिया, जुहू, मार्वे यांसारख्या पर्यटन स्थळांसाठी रात्री 12 वाजेपर्यंत जादा बसेस सोडल्या जातील. (उदा. C-86, 203, 231 आणि अनेक एसी बसेस).
हेरिटेज बस: पर्यटकांच्या प्रतिसादानुसार 31 डिसेंबरच्या सायंकाळी 5:30 पासून ते पहाटेपर्यंत 'हेरिटेज ओपन डेक' बस सेवा सुरू राहील.
लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वेळेत बदल
दरम्यान,1 जानेवारीपासून दक्षिण मध्य रेल्वेने नवीन वेळापत्रक लागू केले आहे. जनशताब्दी एक्स्प्रेससह अनेक गाड्यांच्या वेळेत बदल झाला आहे. ज्यांचे आरक्षण 1 जानेवारीनंतरचे आहे, त्यांनी अधिकृत वेळेची खात्री करूनच प्रवासाला निघावे, असे आवाहन करण्यात आले आहे.