Sharad Pawar NCP : शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीत महिला आघाडी नेतृत्वात बदल; विदर्भातील ‘या’ महिला नेत्याला मिळू शकते संधी, लवकरच होणार घोषणा

गेल्या 3 वर्षांपासून महिला प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळणाऱ्या खानदेशातील नेत्या रोहिणी खडसे यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने, आता हे महत्त्वाचे पद विदर्भाकडे सोपवले जाणार आहे.

Sharad Pawar NCP : शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीत महिला आघाडी नेतृत्वात बदल; विदर्भातील ‘या’ महिला नेत्याला मिळू शकते संधी, लवकरच होणार घोषणा

Sharad Pawar NCP: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आपल्या महिला संघटनेमध्ये महत्त्वाचा संघटनात्मक बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या 3 वर्षांपासून महिला प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळणाऱ्या खानदेशातील नेत्या रोहिणी खडसे यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने, आता हे महत्त्वाचे पद विदर्भाकडे सोपवले जाणार आहे. नागपूर विभागातील आक्रमक महिला नेत्या डॉ. अंजली साळवे यांची पक्षाच्या नव्या राज्य महिला अध्यक्षा म्हणून निवड जवळपास निश्चित झाली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या हस्ते त्यांना लवकरच अधिकृत नियुक्तीपत्र प्रदान केले जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

हेही वाचा – Indian Politics : केंद्रातील राजकारणात मोठे बदल? ‘या’ तीन महिला नेत्यांच्या भेटीने चर्चांना उधाण; नेमकं काय शिजतयं?

अभ्यासू आणि आक्रमक चेहरा म्हणून डॉ. साळवे यांची ओळख

नवनियुक्त महिला अध्यक्षा डॉ. अंजली साळवे या विविध सामाजिक आणि राजकीय व्यासपीठांवर पक्षाची बाजू अत्यंत प्रभावीपणे मांडण्यासाठी ओळखल्या जातात. राज्य महिला आयोगावरील अध्यक्ष व सदस्यांच्या नियुक्त्यांच्या मुद्द्यावरून त्यांनी तत्कालीन सरकारवर जोरदार टीका केली होती. महिला आयोगावर केवळ राजकीय पुनर्वसन न करता महिला कायदे आणि प्रश्नांची सखोल जाण असणाऱ्या अभ्यासकांचीच वर्णी लागली पाहिजे, अशी स्पष्ट आणि आक्रमक भूमिका त्यांनी घेतली होती. त्यांच्या या संघटनात्मक आणि अभ्यासू कौशल्यामुळेच शरद पवारांनी त्यांच्याकडे ही मोठी जबाबदारी सोपवण्याचा निर्णय घेतला आहे.

लक्ष्मण बांदल यांच्याकडे प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी 

दुसरीकडे, रोहिणी खडसे यांनी 3 वर्षे पूर्ण केल्यानंतर आता पक्ष त्यांना कोणती नवीन राष्ट्रीय किंवा राज्यातील मोठी जबाबदारी देणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. याच दरम्यान पक्षाचा विस्तार अधिक मजबूत करण्यासाठी उद्योजक लक्ष्मण बांदल यांची पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी वर्णी लावण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या हस्ते बांदल यांना पत्र सोपवण्यात आले. हवेली तालुक्यातील वडाचीवाडीचे माजी सरपंच राहिलेले बांदल हे पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते असून, नव्या जबाबदारीमुळे ग्रामीण भागात पक्षाची ताकद वाढण्यास मदत होणार आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number