Bhandara Nana Patole Garba Video: राज्यात सध्या 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. उद्या, 15 जानेवारी रोजी महानगरपालिकांसाठी मतदान होणार असून 16 जानेवारीला निकाल जाहीर होतील. निवडणुकाच्या धामधुमीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांचा एक वेगळा अंदाज पाहायला मिळाला. भंडाऱ्यात आयोजित एका कार्यक्रमात नाना पटोले यांनी गरबा नृत्यावर मनसोक्त ठेका धरला. त्यांच्या या नृत्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. मंगळवारी संध्याकाळी राज्यात प्रचाराच्या तोफा थंडावल्या. या धावपळीतून वेळ काढत नाना पटोले यांनी भंडाऱ्यातील कार्यकर्त्यांसोबत गरब्याचा आनंद लुटला. कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर त्यांनी गोलात फेर धरत डान्स केला, ज्यामुळे स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह पाहायला मिळाला.
निवडणुकीत रामाचे नाव कशासाठी? पटोलेंचा भाजपवर प्रहार
दरम्यान, नाना पटोले यांनी नागपूर येथे माध्यमांशी बोलताना भाजपच्या राजकारणावर सडकून टीका केली. तेलंगणातील काँग्रेस नेते बोम्मा महेश यांच्या विधानाचे समर्थन करत त्यांनी भाजपला काही रोखठोक सवाल विचारले. भाजप केवळ निवडणुकीच्या काळातच भगवान रामाचे नाव का घेते? धर्म आणि राजकारण हे दोन वेगळे घटक आहेत. आम्हीही हिंदू आहोत आणि आमचे आदर्शही श्रीरामच आहेत, पण मतं मिळवण्यासाठी त्यांचा वापर करणे चुकीचे आहे, असे पटोले म्हणाले. निवडणुकीत सरकारने काय काम केले, देशाची प्रगती झाली की नुकसान, यावर चर्चा व्हायला हवी. संविधानिक प्रक्रियेत धर्माचा वापर करण्याऐवजी कामगिरीवर मते मागावीत, असा सल्ला त्यांनी भाजपला दिला.
‘भाजपला महात्मा गांधींचा द्वेष’
नाना पटोले यांनी यावेळी महात्मा गांधींच्या विचारसरणीवरूनही भाजपला लक्ष्य केले. महात्मा गांधी हे केवळ काँग्रेसचे नव्हते तर संपूर्ण देशाचे होते. भाजपला हे मान्य नाही कारण त्यांच्याकडे तसा ‘महात्मा’ नाही. गांधीजींच्या नावाच्या योजना बंद करून भाजप लोकशाहीत विषारी बीज पेरत आहे, असा घणाघाती आरोप त्यांनी केला.