Rahul Gandhi : विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत (RSS) व्यक्त केलेल्या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. देशात प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा घटनात्मक अधिकार असला पाहिजे, असा पुनरुच्चार करत त्यांनी स्पष्ट केले की, अगदी विरोधी विचारांच्या संघटनेच्या बोलण्यावर किंवा विचारांवर गदा आणली गेली, तर आपण त्यांच्याही बाजूने उभे राहू. लोकशाहीत कोणत्याही विचाराचा गळा घोटणे योग्य नसून प्रत्येकाचे 'अभिव्यक्ती स्वातंत्र्य' अबाधित राहिले पाहिजे, या तत्त्वावर त्यांनी विशेष भर दिला. या विधानातून त्यांनी विरोधकांवर हल्ला चढवतानाच लोकशाही मूल्यांचे महत्त्व अधोरेखित केले.
प्रशासकीय यंत्रणा आणि नागरिकांच्या आवाजावर भाष्य
आपल्या संबोधनात राहुल गांधी यांनी पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांच्या कारभारावर टीका करत, सध्याची व्यवस्था सर्वसामान्यांचे गाऱ्हाणे ऐकून घेण्यास नकार देत असल्याचा आरोप केला. जंतरमंतर येथील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा संदर्भ देत ते म्हणाले की, तरुणांना आपले प्रश्न मांडायचे आहेत, परंतु प्रशासनाकडून सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना रोखले जात आहे. याच दरम्यान त्यांनी एका पीडित आईची व्यथा मांडली, जिच्या मुलीवर 4 वर्षांपूर्वी उत्तराखंडमध्ये अत्याचार करून तिला संपवण्यात आलं. न्याय मागणाऱ्या आणि आपली वेदना व्यक्त करू इच्छिणाऱ्या नागरिकांना शांत बसवणे हे लोकशाहीचे लक्षण नाही, असंही यावेळी राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
आरएसएसबाबतची भूमिका आणि आधुनिक भारताचा दृष्टिकोन
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याविषयी बोलताना राहुल गांधी म्हणाले की, ज्या दिवशी देशात 'आरएसएस'च्या विचार मांडण्याच्या अधिकारावर गदा आणण्याचा प्रयत्न होईल, त्या दिवशी मी स्वतः त्यांच्या संरक्षणासाठी पुढे येईन, कारण अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार सर्वांना समान आहे. भारत हा 3,000 वर्षे जुना समृद्ध वारसा असणारा देश असून आजचा आधुनिक भारत समजून घेणे आवश्यक आहे. देशातील जनता आपले विचार मांडण्यापासून कधीही मागे हटणार नाही, त्यामुळे दबाव तंत्राचा वापर करून लोकांचा आवाज दाबणे शक्य नाही, असे मत त्यांनी शेवटी मांडले.