Disha Salian Case: दिवंगत दिशा सालियान हिच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाला मुंबई उच्च न्यायालयातील ताज्या सुनावणीमुळे पुन्हा एकदा वेगळे वळण मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या संपूर्ण घटनेत संशय घेण्यासारखे काही तथ्य आहे का, याची सखोल पडताळणी न्यायालयाला करायची असल्याचे खंडपीठाने स्पष्ट केले. प्रकरणाच्या तपासातील त्रुटींवर बोट ठेवताना न्यायमूर्तींनी अत्यंत महत्त्वाचे सवाल उपस्थित केले. इमारतीच्या 14 व्या मजल्यावरून खाली पडूनही दिशाच्या चेहऱ्यावर गंभीर किंवा दृश्य स्वरूपाच्या जखमा कशा नाहीत, असा प्रश्न खंडपीठाने विचारला.
कपड्यांबाबतचा वाद अन् सरकारी पक्षाचा कोर्टात फोटो पुरावा
सुनावणीदरम्यान घटनास्थळावरील पंचनाम्यातील नोंदींवरूनही जोरदार युक्तिवाद झाला. मृतदेहाचा ताबा घेताना किंवा सुरुवातीच्या पंचनाम्यात शरीरावर कपडे नसल्याचा जो उल्लेख आला होता, त्यावरून न्यायालयाने प्रशासनाला जाब विचारला. यावर स्पष्टीकरण देताना सरकारी वकिलांनी न्यायालयात वस्तुस्थिती मांडली. घटनास्थळावर मिळालेला मृतदेह कपड्यांशिवाय नव्हता, असे सांगत त्यांनी घटनेनंतरचा दिशाचा कपडे असलेला फोटो पुरावा म्हणून खंडपीठासमोर सादर केला.
वडिलांचा जबाब सादर; आर्थिक व्यवहारातील अपयशाचा उल्लेख
या सुनावणीदरम्यान दिशाच्या वडिलांनी 15 जानेवारी 2024 रोजी नोंदवलेला जबाब कागदपत्रांसह न्यायालयात सादर करण्यात आला. एका मोठ्या आर्थिक व्यवहारातील अपयश आणि त्यामुळे आलेले नैराश्य यातूनच दिशाने हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा अंदाज तिच्या वडिलांनी जबाबात व्यक्त केला आहे. तसेच, फौजदारी प्रक्रिया संहितेच्या (CrPC) कलम 164 अंतर्गत नोंदवलेल्या अधिकृत जबाबात त्यांनी या मृत्यूबाबत कोणावरही थेट संशय व्यक्त केलेला नाही, ही बाबही न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आली.
न्यायालयाने निर्णय ठेवला सुरक्षित; संपूर्ण राज्याचे निकालाकडे लक्ष
दिशाच्या वडिलांनी सादर केलेल्या याचिकेवरील सविस्तर युक्तिवाद आणि बाजू पूर्ण झाल्यानंतर उच्च न्यायालयाने आपला अंतिम निर्णय राखून ठेवला आहे. दिशा सालियानच्या मृत्यूबद्दल राजकीय आणि सामाजिक वर्तुळात गेली अनेक वर्षे उलटसुलट चर्चा सुरू आहे. आता न्यायालयाच्या या अंतिम निर्णयाकडे आणि या प्रकरणात पुढे काय कायदेशीर वळण मिळते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.