Supriya Sule : महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्यास सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारच्या कारभारावर टीका केल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे नेते व आमदार अतुल भातखळकर यांनी त्यांना अत्यंत तिखट शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे. "सत्ताधाऱ्यांवर टीका करण्यापूर्वी सुप्रिया सुळे यांनी स्वतःच्या पक्षाची दुरवस्था पाहावी. सध्या त्यांच्या पक्षात अवघे 1 टोयोटा इनोव्हा (Toyota Innova) गाडीत बसू शकतील इतकेच आमदार उरले आहेत," असा खोचक टोला भातखळकर यांनी लगावला. उर्वरित पक्ष सांभाळणे आणि जनतेची सेवा करणे यावरच सुळे यांनी लक्ष केंद्रित करावे, असा सल्लाही त्यांनी दिला.
जरांगे पाटलांचे आंदोलन आणि महायुतीची भूमिका
मराठा आरक्षणाचा प्रश्न आणि मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर बोलताना भातखळकर यांनी स्पष्ट केले की, राज्य सरकार जरांगे पाटील यांच्याशी सतत संवादात आहे. जात पडताळणी समिती ही सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसारच काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच परभणी येथील शेतकरी मेळाव्यावरून निर्माण झालेल्या वादावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, महायुतीमधील शिवसेना हा आमचा महत्त्वाचा घटक पक्ष असून, त्यांना पक्षाचे कार्यक्रम आणि मेळावे आयोजित करण्याचा पूर्ण अधिकार आहे. महायुती सरकार नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहे.
ऑटो चालकांसाठी मराठी भाषेची सक्ती आणि प्रशासकीय धोरण
ऑटो रिक्षाचालकांना व्यावहारिक मराठी भाषा शिकण्यासाठी राज्य सरकारने दिलेल्या 1 वर्षाच्या मुदतवाढीवरही भातखळकरांनी भाष्य केले. राज्यातील प्रत्येक नागरिकाला आणि सेवा देणाऱ्या व्यक्तीला रोजच्या व्यवहारापुरती मराठी भाषा आलीच पाहिजे, असा कायदा आहे. मात्र, प्रशासनाकडून कोणतीही जबरदस्ती न करता समन्वयाचे धोरण स्वीकारले जात आहे. दिलेल्या या 1 वर्षाच्या कालावधीत सर्व परप्रांतीय चालक दैनंदिन व्यवहारापुरती मराठी नक्कीच शिकतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.