Harbhajan Singh viral video: माजी क्रिकेटपटू आणि राज्यसभा खासदार हरभजन सिंग यांनी सोशल मीडियावर अमली पदार्थांच्या नशेत असलेल्या 2 तरुणांचा एक व्हिडिओ शेअर करत पंजाबच्या अमली पदार्थ समस्येवर जोरदार ताशेरे ओढले होते. या व्हिडिओमध्ये पंजाबी फेटा घातलेले 2 तरुण रस्त्यावर नशेत विचित्र पद्धतीने उभे असल्याचे दिसत होते. हरभजन सिंग यांनी ‘झोम्बी ड्रग्ज’चा उल्लेख करत पंजाबमधील तरुणांचे भवितव्य धोक्यात असल्याचे म्हटले होते आणि सरकारवर निशाणा साधला होता. मात्र, या व्हिडिओमुळे पंजाबच्या राजकीय वर्तुळात प्रचंड वाद निर्माण झाला आहे.
पंजाब पोलिसांचे अधिकृत फॅक्ट चेक; व्हिडिओ राजस्थानमधील श्रीगंगानगरचा
हरभजन सिंग यांच्या पोस्टनंतर पंजाब पोलिसांनी आपल्या अधिकृत ‘एक्स’ (X) अकाऊंटवरून तातडीने या प्रकरणाचे फॅक्ट चेक सादर केले. हा व्हिडिओ पंजाबमधील नसून राजस्थानमधील श्रीगंगानगर येथील असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. व्हिडिओत पंजाबी गाणे किंवा ऑडिओ जोडल्याने ती घटना पंजाबची ठरत नाही, असे सांगत पोलिसांनी हरभजन सिंग यांना टॅग करून कोणतीही माहिती किंवा व्हिडिओ शेअर करण्यापूर्वी त्याची शहानिशा करण्याचे आवाहन केले.
ਨਜ਼ਰ ਲੱਗ ਗਈ ਯਾਰ ਸਾਡੇ ਪੰਜਾਬ ਨੂੰ… ? ਸਰਕਾਰਾਂ ਨੇ ਕੀ ਹਾਲ ਬਣਾ ਦਿੱਤਾ ਪੰਜਾਬ ਦਾ ਤੇ ਪੰਜਾਬੀ ਨੌਜਵਾਨਾਂ ਦਾ। ਰੋਣਾ ਆਉਂਦਾ ਏ ਇਹ ਸਭ ਦੇਖ ਕੇ। ? ਬਖ਼ਸ਼ ਦਿਓ ਮੇਰੇ ਪੰਜਾਬ ਨੂੰ… ਮਾਫ਼ ਕਰੋ ਪੰਜਾਬ ਨੂੰ। ? ਕਿੱਥੇ ਲੈ ਆਏ ਓ ਪੰਜਾਬ ਨੂੰ?
ਜਿਹੜਾ ਪੰਜਾਬ ਕਦੇ ਚੜ੍ਹਦੀ ਕਲਾ, ਹਿੰਮਤ ਤੇ ਬਹਾਦਰੀ ਲਈ ਜਾਣਿਆ ਜਾਂਦਾ ਸੀ, ਅੱਜ ਉਸੇ ਪੰਜਾਬ… pic.twitter.com/RAp3aYy0i2 — Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) August 10, 2026
आम आदमी पक्षाचा भाजपवर जोरदार हल्लाबोल; राज्याची प्रतिमा मलीन करण्याचा आरोप
पंजाब पोलिसांच्या या खुलाशांतर सत्ताधारी आम आदमी पक्षाने (AAP) हरभजन सिंग आणि भारतीय जनता पक्षावर (BJP) आक्रमक टीका करण्यास सुरुवात केली आहे. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अशा प्रकारचा दिशाभूल करणारा व्हिडिओ पसरवण्यासाठी वरिष्ठांकडून आदेश आले होते का, असा सवाल उपस्थित केला. तर पंजाबच्या कॅबिनेट मंत्री डॉ. बलजीत कौर यांनी राजस्थानचा व्हिडिओ पंजाबचा म्हणून दाखवून राज्याची प्रतिमा मलीन करण्याचा हा भाजपचा प्रयत्न असल्याचा गंभीर आरोप केला.
पक्षबदलानंतरचा पहिलाच मोठा वाद; राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा
एप्रिल 2016 मध्ये आम आदमी पक्षाला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर हरभजन सिंग यांच्यावर झालेला हा पहिलाच मोठा राजकीय हल्ला मानला जात आहे. भाजपमध्ये गेल्यानंतर पंजाबच्या मुद्द्यांवर ते सोशल मीडियावर सातत्याने सक्रिय राहिले आहेत. मात्र, चुकीची माहिती असलेला व्हिडिओ पोस्ट केल्यामुळे ते सध्या विरोधकांच्या निशाण्यावर आले असून यावरून पंजाबच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत.
नेटिझन्स आणि मंत्र्यांकडून संतप्त प्रतिक्रिया; सावधगिरी बाळगण्याचे पोलिसांचे आवाहन
या व्हिडिओमधील तरुणांनी खरोखरच ‘झोम्बी ड्रग्ज’ घेतले होते का, याची कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही. तरीही या व्हिडिओचा वापर राजकीय हेतूसाठी करण्यात आल्याने नेटिझन्सकडून देखील विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. पंजाब पोलिसांनी अशा प्रकारच्या अफवांपासून दूर राहण्याचे आणि दिशाभूल करणाऱ्या पोस्टवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.