Nagpur Shocking Incident: अंगावर रंग उडवला म्हणून संताप; सख्ख्या आजीनेच नातवावर उकळतं पाणी ओतलं, सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल

नागपूरमधील कोराडी परिसरात रंग खेळताना अंगावर रंग उडाल्याच्या रागातून आजीने चार वर्षांच्या नातवावर उकळते पाणी ओतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Nagpur Shocking Incident: अंगावर रंग उडवला म्हणून संताप; सख्ख्या आजीनेच नातवावर उकळतं पाणी ओतलं, सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल

नागपूर: नागपूर जिल्ह्यातील कोराडी परिसरात अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. रंग खेळताना अंगावर रंग उडाला या कारणावरून एका आजीने स्वतःच्या चार वर्षांच्या नातवावर उकळते पाणी ओतल्याचा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असल्याचे सांगितले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ओम हरीश वांगे असे जखमी झालेल्या चार वर्षीय मुलाचे नाव आहे. तर सिंधू ठाकरे असे संबंधित महिलेचे नाव असून ती मुलाची आईकडील आजी असल्याचे सांगितले जात आहे. सध्या जखमी मुलावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

घटनेच्या वेळी ओम घराबाहेर पिचकारीने रंग खेळत होता. होळीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर परिसरात मुले रंगपंचमीचा आनंद घेत होती. त्याचवेळी सिंधू ठाकरे या होळीवर गरम केलेले पाणी एका बादलीत भरून घराकडे नेत असल्याची माहिती मिळाली आहे. खेळताना ओमने पिचकारीतून रंग उडवत असताना तो रंग आजीच्या अंगावरही उडाला.

हेही वाचा: Austin Bar Shooting: टेक्सास गोळीबारात भारतीय-अमेरिकन विद्यार्थिनीचा मृत्यू; हल्लेखोराच्या ‘इराण कनेक्शन’ने अमेरिकेत खळबळ

अचानक अंगावर रंग उडाल्याने संतापलेल्या आजीने रागाच्या भरात हातातील गरम पाण्याची बादली थेट मुलाच्या अंगावर ओतल्याचा आरोप केला जात आहे. उकळते पाणी अंगावर पडताच ओम वेदनेने जोरजोरात आरडाओरडा करू लागला. या प्रकारामुळे मुलाच्या शरीराच्या कमरेखालच्या भागाला गंभीर भाजल्या गेल्याची माहिती समोर आली आहे.

घटनेनंतर घरातील आणि आसपासच्या लोकांनी तातडीने मुलाच्या अंगावर थंड पाणी टाकून त्याला सावरायचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत मुलगा गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर तातडीने त्याला जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक माहितीनुसार, ओम सुमारे ४५ टक्के भाजल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा: Hawala Racket Busted: रिक्षाचालकाच्या खात्यात 300 कोटींची रक्कम; कोट्यवधींचा व्यवहार पाहून ED अधिकारीही चक्रावले

दरम्यान, या घटनेचा संपूर्ण प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याचे समोर आले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. एका निष्पाप मुलावर असा अमानुष प्रकार घडल्यामुळे अनेकांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे.

ओमचे वडील वेकोलीमध्ये कार्यरत असल्याची माहिती मिळाली आहे. सध्या मुलावर वैद्यकीय उपचार सुरू असून त्याची प्रकृती लक्षपूर्वक पाहिली जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी व्हायरल झालेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला आहे.

या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून अशा प्रकारच्या अमानुष वर्तनाविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे. पोलिस तपासानंतर या प्रकरणातील पुढील कारवाई निश्चित होणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number