Gokul Election 2026 latest update: कोल्हापूर जिल्ह्यातील अत्यंत प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या 'गोकुळ' दूध संघाच्या निवडणुकीवरून महायुतीमधील अंतर्गत कलह आता चव्हाट्यावर आला आहे. गेल्या वर्षभरापासून गोकुळची निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढण्याची भाषा करणाऱ्या वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी अचानक आक्रमक पवित्रा घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), शिवसेना (शिंदे गट) आणि जनसुराज्य शक्ती पक्षाकडे मिळून तब्बल 3500 ठराव असल्याचा दावा मुश्रीफ यांनी केला आहे. या आकडेवारीच्या माध्यमातून त्यांनी महायुतीतील मुख्य घटक पक्ष असलेल्या भाजपला आणि पर्यायाने महाडिक गटाला 'तुमची गरज नाही' असाच अप्रत्यक्ष आणि कडक इशारा दिल्याचा राजकीय अर्थ लावला जात आहे.
1400 संस्थांच्या पात्रतेवरून महायुतीमधील 'अदृश्य शक्ती' विरुद्ध राष्ट्रवादी संघर्ष
गोकुळ निवडणुकीसाठी प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध झाल्यानंतर सत्तांतरानंतरच्या काळात सभासद झालेल्या संस्थांवर मोठे आक्षेप घेण्यात आले होते. शासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांपासून ते अगदी सर्वोच्च न्यायालयापर्यंत कायदेशीर लढाई लढून सुमारे 1400 संस्थांना अपात्र ठरवण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र, न्यायालयाने या सर्व 1400 संस्थांना दिलासा देत पात्र ठरवले. महायुतीतील एका 'अदृश्य शक्ती'नेच या संस्था अपात्र ठरवण्यासाठी पडद्यामागून हालचाली केल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या गोटातून झाला होता, ज्यानंतर दोन्ही गटांतील दरी अधिक रुंदावली आहे.
3500 ठरावांचा दावा आणि 'माझं ठरलंय'च्या धर्तीवर नवा पेच
पत्रकारांशी संवाद साधताना हसन मुश्रीफ यांनी न्यायालयीन लढाईच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांच्यावर निशाणा साधला खरा, परंतु त्यांनी मांडलेली गणिते भाजपसाठी चिंतेचा विषय ठरली आहेत. गोकुळमध्ये एकूण 5454 संस्था मतदानासाठी पात्र ठरल्या आहेत. निवडणुकीत सत्ता मिळवण्यासाठी किंवा विजयासाठी किमान 2700 ठरावांची (मतांची) आवश्यकता असते. मुश्रीफ यांनी थेट 3500 ठराव आपल्या बाजूने असल्याचे जाहीर केल्याने भाजपला वगळूनही सत्ता स्थापन करण्याचा हुकूमी एक्का आपल्याकडेच असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
जागावाटपाच्या सूत्रावरून महायुतीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता
गोकुळ दूध संघातील संचालकपदाच्या जागांचे वाटप हे प्रामुख्याने ज्या त्या पक्षाकडे किंवा गटाकडे असलेल्या ठरावांच्या संख्येवर अवलंबून असते. मंत्री मुश्रीफ यांनी भाजपला बाजूला ठेवून स्वतंत्रपणे दाखवलेल्या या शक्ती प्रदर्शनामुळे जागावाटपाच्या वाटाघाटी अत्यंत कठीण होण्याचे संकेत मिळत आहेत. जर जागावाटपावरून महायुतीत मतभेद निर्माण झाले, तर गोकुळची ही निवडणूक महायुती विरुद्ध महाविकास आघाडी ऐवजी महायुतीतीलच घटकांमध्ये अत्यंत चुरशीची आणि रंगतदार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आता भाजप आणि महाडिक गटाच्या पुढील रणनीतीकडे सर्वांचे लक्ष
मुश्रीफ यांच्या या राजकीय गुगलीमुळे कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. एकीकडे सतेज पाटील आणि दुसऱ्या बाजूला महाडिक गट अशा पारंपरिक संघर्षात आता मुश्रीफांच्या दाव्याने नवा ट्विस्ट आणला आहे. 'सोबत आलात तर ठीक, नाहीतर आमची तयारी पूर्ण आहे' या भूमिकेनंतर भाजप आता यावर काय प्रत्युत्तर देते आणि कोणती नवी व्यूहरचना आखते, यावरच गोकुळच्या आगामी निवडणुकीची संपूर्ण राजकीय समीकरणे अवलंबून असणार आहेत.