Vishakha Raut: मुंबई महापालिकेतील ठाकरे गटाच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी महापौर विशाखा राऊत यांच्या राजकीय भवितव्यावर टांगती तलवार निर्माण झाली आहे. पालघर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने विशाखा राऊत यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवल्याने पालिकेतील त्यांचे नगरसेवकपद धोक्यात आले आहे. या निर्णयामुळे ठाकरे गटाला मोठा राजकीय धक्का बसला असून, आपले पद वाचवण्यासाठी राऊत यांनी कायदेशीर लढाई सुरू केली आहे. पडताळणी समितीच्या या निर्णयाविरोधात कोकण विभाग आयुक्तांकडे दाद मागितल्यानंतर आता त्यांनी थेट उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. जात दाखल्यासंदर्भातील ही कारवाई राजकीय वैमनस्यातून झाल्याचा आरोप करत त्यांनी या निर्णयाला आव्हान दिले आहे.
सरवणकर पिता-पुत्रांची शिंदेंकडे धाव; पालिका आयुक्तांच्या निर्णयाची प्रतीक्षा
दुसरीकडे, शिंदे गटाचे नेते सदा सरवणकर आणि त्यांच्या कन्या प्रिया सरवणकर यांनी या प्रकरणात अधिक आक्रमक भूमिका घेतली आहे. जात प्रमाणपत्र रद्द होताच सरवणकर पिता-पुत्रांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन मुंबई महापालिका आयुक्त आणि प्रशासकांकडे विशाखा राऊत यांच्या अपात्रतेची कारवाई लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी केली. महापालिकेच्या नियमांनुसार, जर एखाद्या लोकप्रतिनिधीचे जात प्रमाणपत्र अवैध ठरले, तर निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या उमेदवाराला विजयी घोषित केले जाऊ शकते. याच नियमाचा आधार घेत सरवणकर यांनी आपल्या बाजूने दावेदारी भक्कम करण्यास सुरुवात केली आहे.
सत्तेचा गैरवापर करून अधिकाऱ्यांवर दबाव आणला; विशाखा राऊतांचा गंभीर आरोप
या राजकीय घडामोडींवर विशाखा राऊत यांनी अत्यंत कडक शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. आपल्याविरोधात कट रचून जात प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी सत्ताधारी पक्षाने प्रशासकीय यंत्रणांवर प्रचंड दबाव आणल्याचा आरोप त्यांनी केला. "माझी मुलगीच नगरसेवक होणार, हे सदा सरवणकर यांना महिनाभरापूर्वीच कसे माहीत पडले? त्यांना आधीच स्वप्न पडले होते का?" असा थेट सवाल उपस्थित करत त्यांनी राजकीय हस्तक्षेपाची शंका व्यक्त केली. सध्या हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असून, विशाखा राऊत यांना तिथून दिलासा मिळणार की महापालिका त्यांच्या अपात्रतेची अधिकृत घोषणा करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.