Sanjay Raut On BJP: नीट (NEET) परीक्षेतील पेपरफुटीच्या प्रकरणावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले असून शिवसेना (UBT) नेते संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार हल्लाबोल केला आहे. “नीट पेपरफुटीच्या गैरव्यवहाराला पूर्णपणे भाजप जबाबदार असून, अटक करण्यात आलेल्या प्रत्येक आरोपीचे संबंध थेट भाजपशी निघत आहेत,” असा खळबळजनक दावा राऊत यांनी माध्यमांशी बोलताना केला. या प्रकरणातील मास्टरमाईंड आणि सहभागी लोकांची सखोल चौकशी करण्याची मागणी करत त्यांनी केंद्रातील सत्ताधारी पक्षाला लक्ष्य केले आहे.
शैक्षणिक संस्था भाजपकडून हायजॅक केल्याचा दावा
संजय राऊत यांनी आरोप केला की, देशातील महत्त्वाच्या सर्व शैक्षणिक संस्था सध्या भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात आहेत. या संस्थांमध्ये भाजपच्या विचारांची आणि त्यांच्या जवळची माणसे बसवण्यात आली आहेत, ज्यामुळे अशा प्रकारची मोठी चोरी आणि गैरव्यवहार करणे शक्य झाले आहे. “भाजपच्या आशीर्वादाशिवाय इतकी मोठी चोरी होऊच शकत नाही,” असे सांगतानाच त्यांनी NET आणि NEET या परीक्षांमधील गोंधळासाठी भाजपच्या यंत्रणेला जबाबदार धरले आहे.
भाजपच्या लोकांची चौकशी करण्याची मागणी
पेपरफुटी प्रकरणात ज्यांना अटक झाली आहे, त्यांचे भाजपशी असलेले लागेबांधे समोर येत असल्याचा पुनरुच्चार राऊत यांनी केला. “अटक केलेल्या प्रत्येक माणसाचा भाजपशी संबंध आहे, हे स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे या प्रकरणाची केवळ वरवरची चौकशी न करता, यामागे असलेल्या भाजपच्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची चौकशी झाली पाहिजे,” अशी मागणी राऊत यांनी लावून धरली आहे. या प्रकरणाने देशातील लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागले असून, हे मोठे शैक्षणिक पाप असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.