Ladki Bahin Yojana: राज्य सरकारच्या अत्यंत लोकप्रिय योजनांपैकी एक मानली जाणारी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. महिलांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत देणाऱ्या या योजनेत चालू असलेल्या केवायसी प्रक्रियेमुळे अनेक महिलांना त्रास सहन करावा लागत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यातच नियमांचे उल्लंघन करून लाभ घेणाऱ्या काही लाभार्थ्यांची नावे वगळल्याने प्रकरण आणखी चिघळले. या मुद्द्यांवर आज राज्य विधिमंडळाचे कामकाज अक्षरशः तापले.
विरोधकांचा आरोप; योजनेत मोठी गडबड, बोगस फॉर्म भरले गेले
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सरकारवर थेट हल्ला चढवत आरोप केला की, 'अंगणवाडी सेविका, आशा वर्कर आणि ग्रामसेवकांना फॉर्म भरण्याचे अवास्तव टार्गेट देण्यात आले. दबावाखाली अनेकांनी बोगस फॉर्म भरल्याची उदाहरणं समोर आली आहेत. हा पैसा सत्ताधाऱ्यांचा नाही, जनतेचा आहे… त्यामुळे हिशोब द्यावा लागेल.' त्यांच्या मते, योजनेचे व्यवस्थापन पूर्णपणे कोलमडले असून गोंधळाला जबाबदार कोण याची चौकशी व्हायला हवी.
वाद निर्माण करू नका, सर्व प्रक्रिया पारदर्शक; सरकारचे प्रत्युत्तर
दरम्यान, महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी विरोधकांचे आरोप फेटाळून लावत सांगितले की, योजनेसाठी ऑनलाइन पोर्टलसह ऑफलाइन नावनोंदणीची सुविधाही उपलब्ध होती. त्यामुळे जाणूनबुजून वाद निर्माण करण्याची गरज नाही.
हेही वाचा – ED Raids: बारामती पुन्हा ईडीच्या रडारवर; दुग्ध व्यवसायात शेकडो कोटींचा गैरव्यवहार
उपमुख्यमंत्री शिंदे यांची टीका आणि आश्वासन
विरोधकांच्या आरोपांवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर देताना नाना पटोले यांच्यावर जोरदार टीका केली. शिंदे म्हणाले, लाडकी बहीण योजनेला सुरुवातीला विरोध केलेला तुम्हीच. त्याचा परिणाम तुमच्या स्वतःच्या पराभवावर झाला. जर अजूनही या योजनेविरोधात बोलत राहिलात, तर लाडक्या बहिणी तुम्हाला कायम घरी बसवतील. वाढीव 2100 रुपयांच्या मदतीबद्दल विचारण्यात आले असता शिंदे यांनी महत्त्वाची घोषणा केली. 'योग्य वेळ आली की लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा लाभ नक्की देऊ,' असंही एकनाथ शिंदे यांनी यावेळी नमूद केलं.